पुणे :  वाहतूक कोंडी टाळायची आहे ? अवजड वाहनांना प्रवेश नको | पुढारी

पुणे :  वाहतूक कोंडी टाळायची आहे ? अवजड वाहनांना प्रवेश नको

पुणे :  पुढारी वृत्तसेवा :  शहरात प्रवेश करण्यास बंदी असतानाही अनेक जड वाहने शहरात येतात. बस आणि रिक्षा थांबा नसेल तेथे थांबतात, यामुळे शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतच आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांना पत्र देऊन विविध उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. शहराच्या मध्यवर्ती आणि छोट्या रस्त्यांवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने बिनदिक्कतपणे येत असून कोंडीत भर घालत आहेत. यासोबतच अगदी लक्ष्मी रस्त्यासारख्या गजबजलेल्या रस्त्यावर थांबा नसतानाही रिक्षा चालकांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या असतात. हीच परिस्थिती शिवाजी रोड, बाजीराव रोडवरही पाहायला मिळते.

यासोबतच बेकायदा सीट वाहतूक करणार्या रिक्षाही बसथांबे परिसरात कोंडाळे करून थांबत असून यामुळे प्रवाशांसोबतच पीएमपीएमएल चालकांचे हाल होतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियंत्रणासाठी अधिकचे प्रयत्न केल्यास शहरातील वाहतूक सुरळित होईल, असा दावा महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

शहरात वाहतूक कोंडीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. बंदी असलेल्या रस्त्यांवरील अवजड वाहनांची वाहतूक याला कारणीभूत ठरत आहे. तसेच बसेस व रिक्षा देखिल योग्य ठिकाणी थांबत नसल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. वाहतूक पोलिसांनी बंदी असलेल्या रस्त्यांवर अवजड वाहनांना अटकाव करावा,असे पत्र वाहतूक पोलिस उपायुक्तांना दिले आहे.
        – सचिन इथापे, उप आयुक्त, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका.

Back to top button