नाशिकच्या सिडकोत घरफोडी; 44 तोळे सोने, ८ किलो चांदी व रोख रकमेवर डल्ला
नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा
सिडको कामाठवाडे परिसरातील सायखेडकर हॉस्पिटल परिसरात अज्ञात चोरट्याने धाडसी घरफोडी करत बंद घराचे खिडकीचे गज कापून घरातून ४४ तोळे सोने, ८ किलो चांदी व रोख रक्कम असे एकुण १३ लाख ९८ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी राजेश जगन्नाथ गायकर, (१ श्री समर्थ कृपा बंगलो, लक्ष्मी नगर, कामटवाडे, अंबड लिंक रोड, सायखेडकर हॉस्पिटलच्या मागे, त्रिमुर्ती चौक, सिडको) हे कामानिमित्त सहपरिवार नांदगाव येथे गेलेले असताना अज्ञात चोराने घराच्या खिडकी खालच्या बाजुचा लोंखडी गज कापून घरात प्रवेश केला व घरातील कपाटातून ४ तोळे वजनाची सोन्याची पोत, २ तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस, १ तोळे वजनाचे सोन्याची अंगठी, ४ ग्रॅम वजनाची २ सोन्याच्या नथी, १ तोळा वजनाची सोन्याची चैन, ३ तोळा वजनाचे सोन्याचे कानातले, ३ तोळा वजनाचे ३ सोन्याच्या अंगठया, ५ तोळे वजनाचे ७ सोन्याचे अंगठया, २ तोळे वजनाचे सोन्याचे लहान मुलाचे कानातील दागीने, ४ तोळा वजनाचे सोन्याचे मोठे नेकलेस, २५ तोळे वजनाचे सोन्याचे लहान नेकलेस, २ तोळा वजनाचे सोन्याचे २ कॉइन, २.५ तोळे वजनाचे सोन्याचे ५ कॉइन, १ तोळा वजनाचे सोन्याचे मनी, ४ तोळा वजनाचे सोन्याचे गळयातील पोत, ६ तोळा राजनाचे सोन्याचे बागडया असे ४४ तोळे सोने व ८ किलो वजनाचे वेगवेगळे चांदीचे दागीने व ३ लाख रूपये रोख रक्कम असा सुमारे १४ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगिरथ देशमुख, पोलिस उपनिरीक्षक हरसिंग पावरा सह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हरसिंग पावरा करीत आहेत.