पुढारी ऑनलाईन – बलात्काऱ्याला दयाळू म्हणणे ही अनावधानाने घडलेली चूक होती, हे मान्य करत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने निकालपत्रात दुरुस्ती केली आहे. गेल्या आठवड्यात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणातील दोषीला ठोठावण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करत २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. MP HC modifies order rape convict kind enough
पण हा निकाल देताना न्यायमूर्तींनी या गुन्ह्यातील दोषी हा दयाळू आहे, त्याने पीडितेला जिवंत सोडले, अशी टिप्पणी केली होती. या टिप्पणीने अनेकांनी आक्षेप घेतला होता. यानंतर न्यायमूर्तींनी निकालपत्रात दुरुस्ती करत वादग्रस्त टिप्पणी दूर केली आहे.
सुबोध अभ्यंकर, सत्येंद्र कुमार सिंग यांच्या पीठाने १८ ऑक्टोबरला हा निकाल दिला होता. यावर वाद निर्माण झाल्यानंतर २७ ऑक्टोबरला निकालपत्रात दुरुस्ती करण्यात आली.
"18 ऑक्टोबर २०२२ला दिलेल्या निकालात काही चुका अनावधनाने झाल्या असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. बलात्काराचा दोषारोप सिद्ध झालेल्या व्यक्तीचा उल्लेख 'दयाळू' असा झाला होता. न्यायमूर्तींनी या दोषीचं कृत्य राक्षसी असल्याचे या निकालात म्हटलेले आहे त्यामुळे 'दयाळू' म्हणणे अनावधानाने झालेली चूक आहे हे स्पष्ट होते."
दुरुस्त केलेल्या दोषारोप पत्रातील वाक्य असे आहे. "पीडितेला दोषीने कोणताही शारीरिक इजा केलेले नाही. त्यामुळे दोषीची फाशीची शिक्षा कमी करून ती आता २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा असे करण्यात येत आहे." उर्वरित निकालपत्रात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
या प्रकरणातील दोषीने १२ वर्षाच्या एका मुलीवर बलात्कार केला होता. या दोषीला अतिरिक्त सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात दोषीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
हेही वाचा