धुळे: पुढारी वृत्तसेवा
जमीन मोजणीसाठी वीस हजाराची लाच स्वीकारणाऱ्या शिंदखेडा येथील छाननी लिपिकास जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोरी पुन्हा चव्हाट्यावर आली असून या विभागातील लाचखोर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
जळगावातील महाबळ भागातील तक्रारदाराची शिंदखेडा तालुक्यात शेतजमीन आहे. तक्रारदाराने जमीन मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर चार गटाचे काम करून देण्यासाठी 40 हजारांची मागणी आरोपी छाननी लिपिक सुशांत अहिरे यांनी केली. तक्रारदाराने त्यास सुरूवातीला 20 हजार रुपये दिले. उर्वरीत 20 हजारांची मागणी केल्यानंतर जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर शनिवारी (दि.7) लाचेची पडताळणी करण्यात आली. शहरातील प्रांताधिकारी कार्यालय आवारातील भूमी अभिलेख कार्यालय परीसरात आरोपीने लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार धुळे येथील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सापळा रचून जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कामगिरी यशस्वी केली. विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी लाचखोर लिपिकाने संबंधित तक्रारदाराला पैसे देण्यासाठी धुळ्यात बोलावले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येथे सापळा रचल्याप्रमाणे तक्रारदाराकडून पैसे स्वीकारतात लाचखोर अहिरे याच्यावर पथकाने झडप घातली. तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच त्यास पकडण्यात आले. जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्यांनी सापळा यशस्वी केला.