आता शेतकर्‍यांसाठीच पोषणमूल्य आधारित शेतीची गरज; नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचा अनोखा उपक्रम | पुढारी

आता शेतकर्‍यांसाठीच पोषणमूल्य आधारित शेतीची गरज; नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचा अनोखा उपक्रम

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : शेतक-यांसह सर्वसामान्य कुटुंबालाही विषमुक्त व न्यूट्रिशनमूल्य अधिक असलेले अन्नधान्य खाण्याची, मिळण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र (केवीकेच्या) वतीने शेतक-यांसाठी एक एकरमध्ये पोषणमूल्य आधारित शेती व सर्वसामान्य कुटुंबांसाठी दोन गुंठ्यांत ”न्यूट्रिशन गार्डनचे” मॉडेल विकसित करण्यात आले आहे. येत्या फेब—ुवारी महिन्यात ग्लोबल कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून, हे न्यूट्रिशन गार्डनचे मॉडेल शेतकरी व सर्वसामान्य लोकांना पाहाण्यासाठी खुले करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांत अधिक उत्पादन घेण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रासायनिक खते- औषधांचा वापर वाढला. तसेच आधुनिक शेती करण्याच्या नादात शेतीला आराम देणे बंद झाले. याचे परिणाम आता थेट शेतक-यांच्या कुटुंबावर होताना दिसत आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेडसह बहुतेक सर्व ठिकाणी आधुनिक शेती करणा-या भागात पाच-दहा कुटुंबांमागे कॅन्सरचा रुग्ण आढळून येत आहे. घरातील स्री, कर्तापुरुष कॅन्सरच्या विळख्यात सापडल्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होताना दिसत आहेत.

या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आता शेतक-यांनी किमान आपल्या घरी खाण्यापूर्ती विषमुक्त व न्यूट्रिशन मूूल्य अधिक अन्नधान्यांचे पीक घ्यावे यासाठी नारायणगाव केवीकेच्या वतीने पोषणमूल्य आधारित शेती व न्यूट्रिशन गार्डन अशी दोन स्वतंत्र मॉडेल तयार केली आहेत. याबाबत नारायणगाव केवीकेच्या गृहविज्ञानविषय तज्ज्ञ निवेदिता शेटे यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्षे भरडधान्य वर्षे म्हणून घोषित केले असून, पुन्हा एकदा शेतक-यांनी गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी ही पिके घ्यावीत म्हणून केंद्रशासन विशेष प्रयत्न करत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर नारायणगाव केवीकेच्या वतीने शेतक-यांसाठी स्वतःचे कुटुंब व काही विक्रीसाठीदेखील विषमुक्त व सर्वाधिक पोषणमूल्य असलेले कडधान्य, भाजीपाला, फळभाज्या, विविध सीझनल फळे उपलब्ध व्हावीत म्हणून एक एकरमध्ये पोषणमूल्य आधारित शेती मॉडेल आणि पूर्णपणे घरगुती वापरासाठी दोन गुंठ्यांत ‘न्यूट्रिशन गार्डन‘ मॉडेल विकसित केली आहेत. यामध्ये संबंधित कुटुंबांचे संपूर्ण पोषण होईल यासाठी आवश्यक सर्व पिकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये नाचणी, बाजरी, ज्वारी, खपली गव्हापासून ते बटाटा, कोंबी, मेथी, शेपू, पालक सर्व पालेभाज्या, फळभाज्या, तुर, हरभरा, राजमा, कांदा, मुळा, रताळी, कंदमुळे, दुधी व लाल भोपळा, दोडका, वाल, पापडी आदी सर्व पिकांचा समावेश केला आहे.

याशिवाय बहुतेक सर्व फळझाडे, एवढेच नाही, तर एक एकरमध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन आणि शेततळ्यात मत्स्यपालनचादेखील समावेश केला आहे. सर्व लहान-मोठ्या आजारांसाठी घरगुती उपचार करता यावे म्हणून औषधी वनस्पतीचा समावेशदेखील या दोन्ही मॉडेलमध्ये करण्यात आल्याचे शेटे यांनी सांगितले. येत्या फेब्रुवारी महिन्यात 9 ते 12 दरम्यान नारायणगाव केवीके येथे ग्लोबल कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, या प्रदर्शनात ही दोन्ही मॉडेल शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबांना प्रत्यक्ष पाहता येणार असल्याचे शेटे यांनी स्पष्ट केले.

Back to top button