नाशिक, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या व रामसरचा दर्जा प्राप्त नांदूरमध्यमेश्वर (Nandurmadhyameshwar) वन्यजीव अभयारण्यात यंदाच्या दोन दिवसीय पक्षी महोत्सवाला आजपासून (दि.५) सुरूवात झाली. या महोत्सवात तज्ज्ञांच्या चर्चासत्रांची मेजवानी मिळणार आहे. पर्यटन संचालनालय आणि वन्यजीव विभागाच्या संयुक्त विद्यमाने पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सकाळी सहा वाजता नाशिक ते नांदूरमध्यमेश्वर बर्ड सायक्लोथॉन रंगणार आहे.
या महोत्सवाचे (Nandurmadhyameshwar) उद्घाटन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यटन उपसंचालक मधुमती सरदेसाई, वनसंरक्षक वाय.एल.केसकर, पक्षी अभ्यासक दत्ता उगांवकर, डॉ. उत्तम डेर्ले, मधुकर जगताप आदी उपस्थित होते.
दिवसभर सहाय्यक वनसंरक्षक भरत शिंदे, पक्षी अभ्यासक सतीश गोगटे, डॉ. जयंत वडतकर, डॉ. अनिल माळी, डॉ. प्रशांत वाघ, प्रतिक्षा कोठुळे विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तर रविवारी (दि.६) सकाळच्या सत्रात हौशी व व्यावसायिक फोटोग्राफर्सला नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील निसर्गदृश्य आणि पाणवठ्यावरील पक्षी या दोन विषयांशी निगडित फोटो काढता येतील.
इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वन वणवा या विषयावर चित्र रेखाटाता येणार आहे. चर्चासत्रात मानद वन्यजीव रक्षक डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, मनोज हाडवळे यांच्यासह सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुजीत नेवसे सहभागी होणार आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आणि आमदार दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत रविवारी ( दि. ६) महोत्सवाची सांगता होणार आहे.
हेही वाचलंत का ?
पाहा व्हिडिओ :