

नगर : राज्य सरकारने आता गुणवत्तेसोबतच क्रीडा शिक्षणालाही महत्व दिल्याचे समोर येत आहे. त्यानुसार आता जिल्हा परिषद शाळांच्या प्रत्येक केंद्रासाठी एक क्रीडा शिक्षक नेमण्याबाबत शासनाने आदेश काढले आहेत. या आदेशानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 246 पदांची लवकरच ही भरती होणार असून, क्रीडा शिक्षकांसाठी ही मोठी संधी समजली जात आहे. विशेष म्हणजे, क्रीडा शिक्षक मिळाल्यास जिल्हा परिषदेच्या शाळांतूनही चांगले खेळाडू घडणार आहेत.
राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत समूह साधन केंद्राची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार, राज्यात सध्या 4860 समूह साधन केंद्र आहेत. केंद्र स्तरावर आता प्रत्येकी एक क्रीडा शिक्षकाचे पद मंजूर करण्यात आले आहे. लवकरच, केंद्रस्तरीय विशेष शिक्षक पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे क्रीडा शिक्षकांमधून आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा परिषदेतून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक केंद्रावर विशेष शिक्षक म्हणून 246 पदांवर कायमस्वरूपी नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. अगोदरच कंत्राटी काम करणाऱ्या शिक्षकांना त्याच ठिकाणी कायमस्वरुपी नियुक्ती दिली आहे. आता यापाठोपाठ 246 केंद्रांसाठी 246 क्रीडा शिक्षकांचीही पदभरती होणार आहे. संबंधित क्रीडा शिक्षक हे त्या त्या केंद्रांतील शाळांमधील विद्यार्थ्यांंना शाळेवर जाऊन क्रीडा शिक्षण देणार आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास डोळ्यांसमोर ठेवून क्रीडा शिक्षक नियुक्तीबाबत घेतलेल्या या निर्णयाचे शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, प्रवीण ठुबे, भास्करराव नरसाळे, शरद वांढेकर, गौतम मिसाळ, दिनेश खोसे, नारायण पिसे, एकनाथ व्यवहारे, रवींद्र अरगडे, जनार्धन काळे आदींनी स्वागत केले आहे.
नगर झेडपी शिक्षण विभागाची पायाभूत पदे 11 हजार 967 इतकी आहेत. संच मान्यतेनुसार सध्या 10 हजार 300 च्या आसपास पदे दिसत आहेत. त्यामुळे पायाभूत आणि कार्यरत शिक्षकांची संख्या पाहता, जिल्ह्यात 246 क्रीडा शिक्षक भरतीसाठी कोणतीही तांत्रिक अडचण दिसत नाही. त्यामुळे आता केवळ शासनाच्या भरतीच्या निर्णयाकडे लक्ष असणार आहे.