

जामखेड : नवीन कोर्ट रस्ता व म्हाडा वसाहतलगत असलेल्या शेतामध्ये वडील व मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे जामखेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कानिफनाथ ज्ञानदेव पवार (वय 45) व सचित कानिफनाथ पवार (वय 16, दोघेही रा.आरोळे वस्ती, जामखेड) अशी आत्महत्या केलेल्या बाप-लेकाची नावे आहेत. मुलाने ज्या मॅटच्या कापडाने गळफास घेतला, त्याच मॅटच्या कापडाने वडिलांनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कानिफनाथ पवार हे आपल्या कुटुंबासह आरोळे वस्ती येथे राहत होते. दोन/तीन दिवसांपूर्वी त्यांची पत्नी माहेरी गेली होती. दरम्यान, शुक्रवारी (दि.2) रात्री घरगुती कारणावरून बाप-लेकामध्ये वाद झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर मुलगा सचित हा रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघून गेला. यानंतर वडील कानिफनाथ यांनी पहाटपर्यंत मुलाचा शोध घेतला. दरम्यान, नवीन कोर्ट रस्ता व म्हाडा वसाहतीच्या बाजूला असलेल्या शेतातील झाडाला मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा धक्का सहन न झाल्याने त्यांनी मुलाचा मृतदेह खाली उतरवून, त्याच मॅटच्या कापडाने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
याची माहिती मिळताच नगरसेवक महेश निमोणकर व संतोष गव्हाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी कदम व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर संजय कोठारी व दीपक भोरे यांनी रुग्णवाहिकेद्वारे दोन्ही मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश उमासे यांनी दोघांना मृत घोषित केले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.