

राहुरी : बिबट्यांच्या भयावह हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शेत मजुरांच्या सुरक्षेसाठी काही शेतकरी थेट बंदूक हातात घेऊन, शेताच्या बांधावर पहारा देत आहेत. खुडसरगाव येथील शेतकरी सतीश पवार शेताच्या बांधावर बंदूक घेऊन उभे असल्याचे दृश्य सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. शासन व वनविभाग अपयशी ठरत असल्यामुळे शेतकऱ्यांना कायदा हातात घ्यावा लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
राहुरी तालुक्यात बिबट्यांचा वाढता संचार आता भितीपलीकडे जाऊन, थेट जीवघेणा धोका ठरत आहे. दिवसाढवळ्या बिबट्या वन्यप्राण्यांसह पाळीव जनावरांवर, तर काही ठिकाणी शेतकरी, शेत मजुरांवरही हल्ला करीत असल्याच्या घटना वाढत आहेत. परिणामी संपूर्ण तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, शेत मजूर कामासाठी येण्यास नकार देत आहेत. अनेक ठिकाणी शेतीची कामे ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. ‘आम्ही मरायचं का?’ असा शेतकऱ्यांनी थेट सवाल केला आहे.