

चिचोंडी शिराळ : वांबोरी चारीची कळ दाबली की शेतकऱ्यांना बळ येते, असे समीकरण या भागात झाले आहे. यंदा ही कळ दाबून दोन महिने उलटले तरी पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील गावांना पाण्याचा एक थेंबही मिळाला नाही. प्रशासकीय दिरंगाई आणि राजकीय अनास्थेमुळे ऐन उन्हाळ्यात रब्बी पिकांसह फळबागा जळून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
पाथर्डी, नगर आणि राहुरी तालुक्यातील सुमारे 45 गावांसाठी जलसंजीवनी ठरलेल्या वांबोरी चारी योजनेतून 102 पाझर तलाव भरण्याचे नियोजन असते. शासनाने मुळा धरणातील 680 दशलक्ष घनफूट पाणी या योजनेसाठी आरक्षित केले आहे. जानेवारीतच हे पाणी सुटणे अपेक्षित होते, परंतु मार्च संपत आला तरी तिसगाव, मिरी, करंजी, चिचोंडी, कोल्हार, उदरमल यांसारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील शेतकरी अद्याप पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
वांबोरी चारीच्या केवळ दोनच मोटारी सध्या सुरू असल्याने पाण्याचा दाब अत्यंत कमी आहे. परिणामी, पाणी केवळ आव्हरवाडी आणि शिराळ तलावापर्यंतच पोहोचू शकले आहे. राहुरी तालुक्यातील वांजोळी आणि गुंजाळे भागाला याचा लाभ झाला, मात्र, पुढच्या टप्प्यातील पाथर्डी तालुक्याचा भाग कोरडाच राहिला आहे. रब्बी हंगामातील गहू आणि हरभऱ्याची काढणी आता संपत आली आहे, जर हे पाणी 10-15 दिवसांपूर्वी आले असते, तर पिकांना नक्की फायदा झाला असता.
गेल्या 1 मार्चपासून मुळा धरणाच्या उजव्या कालव्याचे 700 क्युसेक वेगाने आवर्तन सुरू झाले आहे. जुन्या अनुभवावरून, एकदा कालव्याचे पाणी सुरू झाले की वांबोरी चारीचे पंपिंग आणि नियोजन पूर्णतः कोलमडते.
लवकरच शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना भेटून वांबोरी चारी पाणी प्रश्नासाठी प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अंबादास डमाळे यांनी सांगितले. यावेळी संतोष गरुड, सातवडचे सरपंच राजेंद्र पाठक, विठ्ठल गायकवाड, पोपटराव आव्हाड, सरपंच रवींद्र मुळे, प्रादेशिक नळ योजनेचे उपाध्यक्ष भीमराज सोनवणे, विष्णू गंडाळ, राजेंद्र गिते, विजय पालवे, सुखदेव गिते, भोसे गावचे सरपंच विलास टेमकर,राजेंद्र आंधळे. उपस्थित होते.