

नवी दिल्ली : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी शुक्रवारी संतप्त प्रतिक्रिया दिली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या की, हा विषय राज्य सरकारचा आहे. मला असे वाटते राज्य सरकार यावर विचार करेल. या प्रकरणामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले असून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. या प्रकरणी तपास चालू आहे, असे त्या म्हणाल्या.
ही घटना धक्कादायक असून संताप आणणारी आहे. या घटनेचा धिक्कार करते, असे विजया रहाटकर म्हणाल्या. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने पोलिसांना सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रवृती ठेचल्या पाहिजेत, असे त्या म्हणाल्या. या प्रकरणी आणखी काही वेळी वाट बघावी, यावेळी अधिक काही बोलणे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या.
संगमनेर ॲसिड हल्ला प्रकरणी बोलताना त्या म्हणाल्या की, ती घटना धक्कादायक होती. आम्ही त्याची तत्काळ दखल घेतली. या विषयात तपास करून रिपोर्ट द्यावा असेल निर्देश पोलिसांना दिले आहेत. त्या मुलीवर उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले असल्याचे त्या म्हणाल्या.