

शिवाजी क्षीरसागर
संगमनेर : अवकाळी पावसाने गुरुवारी संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणी अचानक हजेरी लावून दाणादाण उडवली. पठार भागात गारपीट झाली. जांबुत खुर्द व जांबुत बुद्रुक या दोन गावांमधील सुमारे 125 हेक्टर वरील 180 शेतकऱ्यांचे मोठी आर्थिक हानी झाली. कांदा, टोमॅटो, टरबूज ,पपई, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी दिली.
गेल्या तीन-चार दिवसांपासून संगमनेर तालुक्यात वातावरणात बदलले आहे. अवकाळी पाऊस होईल, हा अंदाज वर्तविण्यात आला होता. गुरुवारी (दि.19) गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी अवकाळी पावसाने संगमनेर तालुक्यात दमदार हजेरी लावली. शहरासह तालुक्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला. कोकणगाव, साकुर, घारगाव, जांबुत आदी गावात पावसानेे हजेरी लावली, मात्र पठारातील काही भागात अवकाळीसह गारपिट झाली. अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकरी नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. शेतात सध्या कांदा, टोमॅटो, टरबूज, पपई, गहू आदी भाजीपाला पिके उभी आहेत. सुदैवाने अनेक शेतकऱ्यांनी शेतातील गहू काढल्यामुळे त्यांच्यावरील नैसर्गिक संकट टळले आहे.
जांबुत बु व जाबुंत खुर्द या दोन गावांमध्ये गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले. पंचनामा करावेत, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली केली होती. कृषी विभागाच्या वतीने पंचनामे केले आहेत. 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. जांबुत बुद्रुक येथे 70 शेतकऱ्यांचे 50 हेक्टर पिकांचे नुकसान झाले. जाबुंत खुर्दमधील 110 शेतकऱ्यांचे 75 हेक्टर पिकांचे नुकसान झाले. असे एकूण 180 शेतकऱ्यांचे 125 हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना कधी व किती भरपाई मिळणार, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. संगमनेर तालुक्यात इतर भागात पाऊस पडला असला तरी, अधिक नुकसान मात्र दोनचं गावात झाले आहे, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नुकसान अहवाल शासनाला सादर केला आहे.
‘अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली, मात्र जाबुंत खुर्द व जांबुत बुद्रुक या दोनचं गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले . 125 हेक्टर कांदा, टोमॅटो, टरबूज, पपई व भाजीपाला पिकांचा यामध्ये समावेश आहे. 180 शेतकऱ्यांचे नुकसान झाले असा अहवाल सादर केला आहे.
रेजा बोडके, तालुका कृषी अधिकारी, संगमनेर.