Vikramsinh Pachpute BJP: विक्रमसिंह पाचपुते ठरणार भाजपचा ‘जेन झी’ चेहरा?

लक्षवेधी कामगिरीने भाजपचे लक्ष वेधले; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीनंतर राज्यस्तरीय जबाबदारीचे संकेत
Vikramsinh Pachpute
Vikramsinh PachputePudhari
Published on
Updated on

संदीप रोडे

सात चिन्ह आणि सात निवडणुका जिंकण्याचा पराक्रम करणाऱ्या बबनराव (दादा) पाचपुते यांना प्रकृतिअस्वास्थ्याने घेरले तेव्हा, आता ते कुटुंबच राजकारणातून संपले, अशा आविर्भावाची हवा विरोधकांच्या शिडात शिरली. दादांचे वारसदार विक्रम यांनी मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतच ती हवा काढून घेतली. त्याच विक्रमच्या विधिमंडळातील ‘लक्षवेधी’ने भाजपचे लक्ष वेधले अन्‌ दादांकडे विक्रमच्या मागणीसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट त्यांच्या काष्टीतील घरी पोहचले. पहिल्यांदाच आमदार झालेले तरुण तडफदार विक्रमसिंह यांच्यावर ‘जेन झी’ची ‘ऊर्जा’ एनकॅश करण्याची जबाबदारी टाकण्याची तयारी भाजपने केल्याचे समोर आले...

Vikramsinh Pachpute
School Food Safety Training: आता शाळांना ‘फसाई’ नोंदणी बंधनकारक; तुकाराम मुंडेंचा पोषण आहारावर वॉच

विविध खात्यांचे मंत्री अन्‌ राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद समर्थपणे पेलणारे बबनदादा नावारूपाला आले ते फक्त आणि फक्त फर्ड्या वक्तृृत्वाने. जनमानसात मिसळणारे बबनदादा अल्पावधीतच जनसामान्यांचे नेते झाले. दांडगा जनसंपर्क, विकासाचे व्हिजन अन्‌ सुसंस्कृत वर्तनाच्या जोरावर त्यांनी श्रीगोंदा काबीज केले अन्‌ सात वेळा सात चिन्हांवर निवडून येण्याचा इतिहासही रचला. पाचपुते हेच चिन्ह हे श्रीगोंद्याच्या मतदारांनीही स्वीकारलं. जनता पक्ष, जनता दल, काँग्रेस, अपक्ष, राष्ट्रवादी असा प्रवास केलेले बबनदादा २०१४ मध्ये भाजपात आले, स्थिरावले. बबनदादांच्या पठडीत तयार झालेले त्यांचे वारसदार विक्रमसिंह हेही दादांसारखेच तरबेज निघाले.

Vikramsinh Pachpute
Taklibhan Gram Sabha: टाकळीभानच्या ग्रामसभेत जोरदार खडाजंगी; रेशन धान्य दुकान, बसस्थानक अन् गावची यात्रा ठरली कळीचा मुद्दा

बबनदादांना प्रकृती साथ देईनासी झाली. विक्रमसिंह त्यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष होते. त्यांनी दादांच्या आमदारकीची सूत्रे हाती घेतली. श्रीगोंद्याचे विकास आराखडे तयार करणे व निधी मिळवण्याची जबाबदारी विक्रम सांभाळू लागले. २०२४मध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाचपुते आता राजकारणातून संपले अशी आवई उठवली गेली. मात्र या संकटातून अत्यंत संयमाने मार्ग काढत बबनदादांचा वारसदार म्हणून विक्रमसिंह विधानसभेच्या मैदानात उतरले. पक्षाच्या स्टार प्रचारकाऐवजी बबनदादाच मुलाचे स्टार प्रचारक झाले. काष्टीच्या ज्या भैरवनाथ चौकातून बबनदादांनी १९८० सालात निवडणुकीचे रणशिंग फुंकले, त्याच चौकात शेवटची सभा घेत राजकीय कारकीर्दीला पूर्णविराम दिला.

हितचिंतकांचे डोळे पाणावले अन्‌ तिथेच विक्रमसिंहच्या विजयाची नांदी ठरली. विधानसभेचा गुलाल पाचपुतेंच्या विक्रमसिंहने उधळला. मात्र उथळ न होता अत्यंत संयमाने श्रीगोंद्याची बांधणी सुरू केली. तितक्याच जोरकसपणे विधीमंडळाच्या आयुधांचा अभ्यासही केला. त्याच जोरावर बनावट पनीर, चीज, शरीराला अपायकारक असलेल्या स्टिंग एनर्जी ड्रिंकवर शाळा परिसरात बंदी अन्‌ आता सर्पदंश आजाराचा अधिसूचित समावेश करण्याचे मुद्दे प्रभावीपणे मांडत विक्रमसिंहने राज्याचेच नव्हे, तर भाजपच्या शीर्षस्थाचे लक्ष वेधले. ग्रामीण विकासाच्या पायाभूत सुविधा, कृषी सुधारणांसोबतच रोजगाराचे प्रश्न जोरकस, मुद्देसूद अन्‌ तितक्याच अभ्यासू वृत्तीने मांडले. स्पर्धा परीक्षेत थोडक्यात संधी हुकलेल्या यशवंतांसाठी यूपीएससीने सुरू केलेल्या ‘प्रतिभा सेतू’च्या धर्तीवर राज्यात ‘निपुण सेतू’ सुरू करण्यामागेही विक्रमसिंह यांची लक्षवेधी कामी आली. थोडक्यात, तारुण्य अन्‌ पहिलीच आमदारकी... विक्रमसिंह यांची तळमळ जेन झीच्या प्रश्नांसोबत जोडली गेल्याचे अधोरेखित झाले.

Vikramsinh Pachpute
Tajanapur Water Release: ‘ताजनापूर’चे पाणी अखेर शेतकऱ्यांच्या बांधावर! आ. मोनिका राजळेंच्या पाठपुराव्याला यश

‘कॉक्रोच’ (सीजेपी) च्या दिल्लीतील आंदोलनाने ‘जेन झी’ राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आली. राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ने ‘जेन झी’ आकर्षिक करण्याचा प्रयत्न चालविला. ही बाब लक्षात येताच भाजपनेही केंद्रीय मंत्र्यांना विद्यापीठांचा ‘टास्क’ दिला. राज्यातील भाजपही ‘जेन झी’साठी मांडणी करत आहे. ‘जेन झी’ची हीच एनर्जी एनकॅश करण्यासाठी प्रदेश भाजपच्या टीममध्ये विक्रमसिंह यांचा समावेश असणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवीद्र चव्हाण खास त्यासाठी श्रीगोंद्यात आले अन्‌ थेट पाचपुतेंच्या निवासस्थानी पोहचले. बबनदादा, प्रतिभाकाकी अन्‌ जिवाभावाच्या समर्थकांसमोर चव्हाण यांनी विक्रमसिंह यांच्या कामाचे कौतूक केले आणि त्यांच्यावर महाराष्ट्राच्या जबाबदारीचे सूतोवाचही केले.

आता विक्रमसिंह पाचपुते यांच्यावर श्रीगोंदा मतदारसंघासोबतच राज्याची जबाबदारी पेलण्याचे आव्हान असेल. आता प्रदेश भाजप आमदार विक्रमसिंह यांच्यावर कोणती नवीन जबाबदारी टाकणार अन्‌ महाराष्ट्रात घेऊन जाणार? हे येणारा काळच सांगेल, तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार.

Vikramsinh Pachpute
Sonai Dowry Case: दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह १६ जणांवर सोनईत गुन्हा दाखल

शांत, संयमी अन्‌ सुसंस्कारी सोबतच तरबेज विक्रमसिंह

राजकीय आखाड्यात कसलेल्या बबनदादांकडून ‘डावपेच’ आत्मसात केलेले विक्रमसिंह पाचपुते विरोधकांना एकामागून एक धक्के देत आहेत. विरोधक एकसंघ झाले अन्‌ पाचपुते यांना नगरपालिका निवडणुकीत खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला, पण आ. पाचपुते यांनी विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळवताना विक्रमसिंहच्या कामी आले ते बबनदादांनी शिकवलेले डावपेच. आता ते जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पटावरील चाली टाकत आहेत. ना उथळ वक्तव्य ना आतातायीपणा, अत्यंत शांत, संयमी आणि विचारपूर्वक राजकीय निर्णय घेणारे विक्रमसिंहाच्या ठायी सुसंस्कारही ओतपोत भरलेले. प्रदेशाध्यक्षांनी मुलाचे गोडवे, कोडकौतुक गावे तेही श्रीगोंद्याच्या राजकारणातील ‘फादर’दादांसमोर.. यापेक्षा एका पित्याला काय हवे..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news