

शेवगाव: पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिके करपण्याच्या मार्गावर असताना ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक २च्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक निर्णय झाला आहे.
शुक्रवार (दि. २१)पासून ताजनापूर योजनेतून सिंचनासाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप हंगामातील पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने अनेक भागांतील पिकांना जीवदान देण्यासाठी पाण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक २च्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडूनही तातडीने पाणी सोडण्याची मागणी सातत्याने केली जात होती.
या पार्श्वभूमीवर आ. मोनिका राजळे यांनी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. शेतकऱ्यांची अडचण आणि पिकांची गंभीर परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली. या पाठपुराव्याला यश आले असून, आता शुक्रवारपासून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मुख्य वितरण कुंडातून नदीपात्रात पाणी
अहिल्यानगर मध्यम प्रकल्प विभागांतर्गत ताजनापूर उपसा सिंचन योजनेत समाविष्ट गावांना योजनेच्या मुख्य वितरणकुंड क्रमांक २ व ३मधून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित नदीपात्रातील बंधारे व आऊटलेटच्या माध्यमातून शेतीसाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पावसाच्या भरवशावर असलेल्या शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचे मोठे संकट उभे राहिले होते. अशा परिस्थितीत ताजनापूरचे पाणी उपलब्ध होणार असल्याने पिकांना जीवदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
उंचावरील क्षेत्रासाठी स्वतंत्र नियोजन
दरम्यान, ठाकूर निमगाव आणि मळेगाव परिसरातील काही शेती क्षेत्र उंचावर असल्याने या भागातील शेतकऱ्यांसाठीही विशेष नियोजन करण्यात आले आहे. या भागात पाणी पोहोचण्यासाठी यांत्रिकी विभागामार्फत पॅनलची उभारणी, तसेच पंपाची जोडणी करण्यात येणार आहे. ही कामे पूर्ण करून येत्या आठ दिवसांत ठाकूर निमगाव व मळेगाव परिसरातही पाणी सोडण्यात येणार असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी स्पष्ट केले.
पावसाअभावी खरीप संकटात
यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पेरणी केली; मात्र पेरणीनंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी जमिनीतील ओलावा संपत चालल्याने पिके कोमेजू लागली आहेत. पावसाची आणखी प्रतीक्षा केल्यास हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
त्यामुळे ताजनापूर उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याचा निर्णय केवळ आवर्तन नसून दुष्काळसदृश परिस्थितीत पिकांना मिळालेला जीवदानाचा आधार ठरणार आहे. पाणी उपलब्ध झाल्यानंतर संबंधित यंत्रणेने कोणताही विलंब न करता नियोजनबद्ध पद्धतीने शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवावे, अशी अपेक्षा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.