

टाकळीभान: टाकळीभान ग्रामपंचायतची ग्रामसभा रेशन धान्य, बसस्टॅंड व यात्रा या मुद्यावर चांगलीच गाजली. तब्बल तीन तास सुरू असलेल्या या ग्रामसभेत शाब्दीक चकमक होवून त्याचे रूपांतर जोरदार खडाजंगीत झाले.
स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा झाली नाही त्यामुळे ग्रामसभा १९ ऑगस्ट रोजी आयोजित केली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच कान्हा खंडागळे होते. ग्रामसेवक भिंगारदे यांनी अहवाल वाचण केले.
ग्रामसभेत अपेक्षीत मुद्द्यावर सुटसुटीत चर्चा होणे गरजेचे होते. मात्र तसे न होता फक्त आरडा ओरड, धांगडधिंग्यातच ग्रामसभा वेगळ्या दिशेने भरकटली. कुठलीही साधक बाधक चर्चा न होता गदारोळातच सभा गुंडाळली गेली. सुरूवातीला ग्रामसेवक भिंगारदे यांनी अहवाल वाचन केले.
तीन-चार वक्त्यांनी पाच ते सात मिनिटांचे मनोगत व्यक्त केले व त्यानंतर रेशन धान्य, बसस्टँड जागा व यात्रा या विषयावरच ग्रामसभा गदारोळातच पार पडली. अनेकांना आपले प्रश्न मांडण्यास संधीही मिळाली नाही. संपूर्ण पाच वर्षाच्या ग्रामपंचायतीच्या कारभाराचे जसे चित्र ग्रामस्थांनी अनुभवले त्यास साजेशी अशीच ही शेवटची ग्रामसभा झाली असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती.
यावेळी व्यासपिठावर राहुल पटारे, राजेंद्र कोकणे, सुप्रिया धुमाळ, भास्करराव कोकणे, अनिल बोडखे, नारायण काळे, शाखाअभियंता गरगडे, यशवंत रणनवरे, आबासाहेब रणनवरे, तलाठी रूपाली रामटेके, संजय रणनवरे, अविनाश लोखंडे आदी उपस्थित होते.
या सदस्यमंडळाची ही शेवटची ग्रामसभा असल्याने ग्रामस्थांना विकासकामासंदर्भात साधक बाधक व तपशीलवार चर्चा होईल याबद्दल कमालीची उत्सूकता होती. मात्र या सर्व बाबींचा भ्रमनिरास होऊन फक्त आणी फक्त मनोरंजनाचा खेळच गावकर्यांना अनुभवयास मिळाला.
ग्रामसेवक भिंगारदे हे अहवाल वाचन करत असतानांच त्यांना काही जणांकडून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न झाला. जलदगतीने अहवाल वाचन आटोपून भिंगारदे हे बाजुला झाले. तद्दनंतर भास्करराव कोकणे यांनी गेल्या पाच वर्षातील ग्रामपंचायतीच्या कारभारावर ताशेर ओढले.
या सदस्य मंडळाने कुठलाही विकास केला नसून फक्त आणि फक्त गलीच्छ राजकारण केले. त्यामुळे अशा गलिच्छ राजकारण करणार्यांना परत निवडून देवू नका असे आवाहन करून या ग्रामसभेतून काढता पाय घेतला.
अनिल बोडखे यांनी अन्नसुरक्षा योजनेबद्दल प्रश्न उपस्थित केले. तसेच आपल्या परिवाराच्या नावाच्या समावेशाचा उल्लेख कसा झाला? याबद्दल विचारणा केली असता तुम्ही मागणी केल्याशिवाय नाव येत नाही, असे उत्तर कान्हा खंडागळे यांनी दिल्याने काही वेळ या दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. ग्रामपंचायत कर्मचार्यांचा पगार वाढविणे तसेच बाजारचा लिलाव रद्द करून कर्मचार्यामार्फत बाजारची वसूली करण्याची मागणी बोडखे यांनी केली.
बापूसाहेब शिंदे यांनी यावेळी अतिक्रमण नियमानुकूल करावे व घरकुलांचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा, अन्यथा ग्रामपंचायत पुढे मी उपोषणास बसेल असा इशारा दिला.
गरज नसतांना येथील व्यावसायीकांचे थोडे फार असलेले अतिक्रमण काढू नये. नाहक व्यापार्यांना त्रास देवू नये असे मत रामभाऊ आरगडे यांनी मांडले. संजय रणनवरे यांनी बसस्टॅंडचा प्रश्न येथील गावपुढार्यांना सोडविता येत नसेल तर राधाकृष्ण विखे पाटील, आ.हेमंत ओगले यांच्यापुढे मी कैफीयत मांडणार असल्याचे सांगून स्टॅंडपरिसरात महिलांसाठी मुतारी बांधण्यात यावी, अशी मागणी केली.
यानंतर सुप्रिया धुमाळ म्हणाल्या की, मुली व महिला या गावात सुरक्षीत नाही. याचा दस्तूरखुद्द अनूभव मला स्वत:ला आला आहे. त्याचबरोबर टाकळीभान ग्रामपंचायचातीच्या मागील काही वर्षापूर्वीच्या सदस्य मंडळाबाबतच्या कारभाराबाबत तसेच यात्रेतील ऑर्केस्टा कार्यक्रम व ग्रामपंचायत जागा नावावर होण्याबाबत प्रश्न विचारताच जोरदार खडाजंगीस सुरूवात झाली.
यावेळी त्यांना उत्तर देताना उपसरपंच कान्हा खंडागळे म्हणाले की, जुन्या सदस्य मंडळाने काय केल? याबद्दल तुम्ही आम्हाला का विचारता? त्याबद्दल आम्हाला माहीती नाही. तसेच यात्रेबद्दलचा संपूर्ण निर्णय हा यात्राकमिटीचा असून त्यात आमचा संबध नाही.
यात्रेत तमाशा व इतर कार्यक्रम हे यात्रेचे अविभाज्य घटक असून त्याशिवाय यात्रेला शोभा नसल्याचे सांगीतले. तसेच यात्रेत लोककलेचे कार्यक्रम ठेवायचे की नाही याबाबत ग्रामस्थांना विचारणा केली. यावेळी मोठ्याप्रमाणात गदारोळ उडाला. तब्बल तीन तासामधील जवळपास दोन अडीच तास याच गदारोळात ही ग्रामसभा पार पडली.
अध्यक्षीय भाषणात कान्हा खंडागळे म्हणाले की, ग्रामसभेत ग्रामस्थांनी जे विषय मांडले, ते विषय जर ग्रामपंचायतच्या अधिकारातील असतील, तर ते विषय सोडविले जातील, मात्र जे विषय ग्रामपंचायतच्या अधिकारात नाही, त्यासाठी ग्रामस्थांनी त्या विषयानुसार त्या विभागाशी संपर्क करून ते विषय सोडवावेत, असे सांगून ग्रामसभा संपल्याचे त्यांनी जाहिर केले.
यावेळी सुधिर मगर, अनिल दाभाडे, आप्पासाहेब रणनवरे, भाऊसाहेब पटारे, अनिल कोकणे, शामवेल खरात, सोमनाथ आरगडे, अक्षय कोकणे, मल्हार रणनवरे, विशाल पटारे, कानीफनाथ जाधव, प्रभाकर रणनवरे, दगडू गायकवाड, एकनाथ पटारे, मधूकर गायकवाड आदी उपस्थित होते.