Vikram 21 Armoured Vehicle: ‘विक्रम 21’ चिलखती वाहनांचे अनावरण; स्वदेशी तंत्रज्ञानाचा नवा टप्पा

व्हीआरडीई-अहिल्यानगरमध्ये DRDOचा प्रगत लढाऊ प्लॅटफॉर्म सादर
Vikram 21 Armoured Vehicle
Vikram 21 Armoured VehiclePudhari
Published on
Updated on

दीपक रोकडे

नगर: भारतीय संरक्षण विभागाच्या अहिल्यानगर येथील व्हेइकल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने (व्हीआरडीई) डिझाइन आणि विकसित केलेल्या प्रगत चिलखती ‌‘विक्रम 21‌’ वाहनांचे (ॲडव्हान्स्ड आरमर्ड प्लॅटफॉर्म्स) (ट्रॅक्ड आणि व्हील्ड) अनावरण शनिवारी (दि. 25) संरक्षण विभागाचे सचिव (संशोधन आणि विकास) आणि ‌‘डीआरडीओ‌’चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांच्या हस्ते झाले. स्वदेशी बनावटीची ही वाहने लवकरच संरक्षण दलाच्या सेवेसाठी सज्ज होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

Vikram 21 Armoured Vehicle
Shirdi Grow More Scam: ग्रो-मोअर घोटाळा: शिर्डीत मालमत्ता जप्त; ठेवीदारांना दिलासा

अहिल्यानगर येथील शानदार सोहळ्यात या दोन्ही वाहनांचे अनावरण करण्यात आले आणि प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. संरक्षण विभागाच्या उत्पादनांमध्ये डीआरडीओसोबत भागीदारी असलेल्या देशभरातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी, शास्त्रज्ञ या वेळी उपस्थित होते. सुरुवातीला या दोन्ही वाहनांच्या निर्मितीप्रक्रियेबाबत माहितीपट दाखविण्यात आला.

‌‘व्हीआरडीई‌’ ही ‌‘डीआरडीओ‌’ची (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) अहिल्यानगर येथील प्रयोगशाळा असून, येथे संरक्षण दलांच्या उदयोन्मुख कार्यात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म्स (वाहने) विकसित करण्यात आले आहेत.

Vikram 21 Armoured Vehicle
Ahilyanagar Municipal Health Center: 10 रुपयांत उपचार; मनपाच्या आरोग्य सेवांकडे नागरिकांचा पाठ फिरव

या दोन्ही प्लॅटफॉर्म्समध्ये स्वदेशी बनावटीचे 30 मिलिमीटर क्रू-लेस टरेट (पोलादी आवरण) बसविण्यात आले आहे. यात गतिशीलता, फायर पॉवर आणि संरक्षणाच्या गरजा पूर्ण करण्याची खास प्रगत वैशिष्ट्ये असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

उच्च शक्तीचे इंजिन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज असलेल्या या प्लॅटफॉर्म्समध्ये उच्च पॉवर-टू-वेट रेशो, उच्च गती क्षमता, चढ-उतार आणि अडथळे पार करण्याची क्षमता, स्तर 4 आणि 5 चे संरक्षण असून, सर्व बाजूंनी मॉड्यूलर स्फोट आणि बॅलिस्टिक संरक्षण प्रणाली बसविण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे प्लॅटफॉर्म्समध्ये सुधारित हायड्रो जेट्सचा समावेश करण्यात आल्याने नदी आणि तलावासारखे जल-अडथळे पार करण्याची क्षमता यात आहे.

या प्लॅटफॉर्मवर 7.62 मिमी पीकेटी तोफेसह 30 मिमी चालकविरहित बुर्ज, रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करण्याची यंत्रणाही बसविण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये मूळ रचनेत विविध प्रसंगी बदल करण्याची क्षमता असून, यात 65 टक्के स्वदेशी घटक असून, ते 90 टक्क्यांपर्यंत वाढविण्याची योजना असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

Vikram 21 Armoured Vehicle
Ahilyanagar Water Scarcity: अहिल्यानगरात पाणीटंचाईची झळ; 26 गावे टँकरवर

या प्लॅटफॉर्मचे उत्पादनात टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड आणि भारत फोर्ज लिमिटेड या दोन औद्योगिक भागीदार असून, त्यात अनेक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सहकार्य लाभल्याचे आणि त्यामुळे विकसित होत असलेल्या संरक्षण परिसंस्थेला बळकटी मिळाली असून, याद्वारे आत्मनिर्भर भारत हे बिरूद सार्थ ठरवीत असल्याचे या वेळी अभिमानाने सांगण्यात आले.

या कार्यक्रमाला शस्त्रास्त्रे आणि लढाऊ अभियांत्रिकी प्रणाली (एसीई); उत्पादन, समन्वय आणि सेवा संवाद (पीसी अँड एसआय) विभागाचे प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आणि महासंचालक; टीएएसएल पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक; बीएफएल पुणेचे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि इतर उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते. वाहन संशोधन आणि विकास विभाग, शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास विभाग, संरक्षण धातूशास्त्र संशोधन प्रयोगशाळा, उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा, लढाऊ वाहन संशोधन आणि विकास विभाग, संशोधन आणि विकास विभाग (अभियंता) यासह डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळांचे संचालक आणि शास्त्रज्ञदेखील उपस्थित होते.

व्हीआरडीईचे संचालक डॉ. जी. राममोहन राव यांनी प्रास्ताविक केले. व्हीआरडीईने विकसित केलेली ही वाहने पर्वतीय, वाळवंटीय, बर्फाळ, जलयुक्त आणि दलदल अशा सर्व प्रदेशांमध्ये आणि सर्व वातावरणांमध्ये उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. 5 जानेवारी 2022 रोजी मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाचे काम अत्यंत वेगाने पूर्ण करून दोन्ही वाहने आज सज्ज केल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी राबविलेल्या संपर्ण प्रक्रियेची माहिती त्यांनी दिली.

Vikram 21 Armoured Vehicle
Ahilyanagar Property Survey Issue: मालमत्ता सर्वेक्षणावर नगरसेवकांचा सवाल; पारदर्शकतेसाठी बैठक मागणी

डीआरडीओच्या डायरेक्टर जनरल डॉ. चंद्रिका कौशिक, डॉ. प्रतीक किशोर, भारत फोर्ड लिमिटेडचे व्हाइस चेअरमन अमित कल्याणी, टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेडचे सीईओ सुकरन सिंह यांचीही या वेळी भाषणे झाली.

‌‘व्हीआरडीई‌’विषयी...

अहिल्यानगर येथील वाहन संशोधन आणि विकास संस्था (व्हीआरडीई) ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची (डीआरडीओ) एक प्रयोगशाळा आहे. ही चाके असलेली आणि हलकी ट्रॅक-आधारित वाहने, वाहनांचे चेसिस व ट्रेलर, मानवरहित हवाई वाहनांसाठीची इंजिने, तसेच वाहनांसाठीच्या विद्युत/इलेक्ट्रॉनिक प्रणाली व नियंत्रकांचे (कंट्रोलर्स) डिझाईन आणि विकास यात कार्यरत आहे.

जगातील सर्वोत्कृष्ट: डॉ. समीर कामत

डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर कामत म्हणाले, की ही फक्त सुरुवात आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून संपूर्ण भारतीय बनावटीची ही दोन चिलखती वाहने (प्लॅटफॉर्म) जगातील सर्वोत्कृष्ट ठरणार असून कोणत्याही युद्धभूमीवर शत्रूला नामोहरम करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. यापुढेही डीआरडीओ भारतीय संरक्षण विभागाच्या सेवेत अहोरात्र संशोधन करत राहणार आहे. त्यासाठी भारतातील विविध उद्योगांचे सहकार्य यापुढेही घेतले जाईल, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news