

डॉ. सूर्यकांत वरकड
नगर: ठेवीदार हित संरक्षण कायद्यानुसार शिर्डीतील बहुचर्चित ग्रो मोअर आणि त्याच्याशी संलग्न सहा कंपन्यांच्या संचालकांची मालमत्ता, बँक खाते, पतसंस्थेतील ठेवी, सोने, घर आणि जमीन जप्त करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. जप्त मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिर्डी प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य ठेवीदार हित संरक्षण (एमपीआयडी) कायद्यानुसार ‘ग्रो-मोअर’ आणि त्यांच्याशी संबंधित अन्य पाच संस्थांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश शासनाने दिले. ठेविदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून ग्रो मोअर कंपनीच्या संचालकांनी फसवूणक करून ठेविदारांचे पैसे परत करण्यास कसूर केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
ग्रो-मोअर कंपनी स्थापन करून आरोपी भूपेंद्र सावळे व त्याच्या साथीदारांनी गुंतवणूकदारांना दरमहा 10 ते 15 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार अनेकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली; मात्र ठरलेला परतावा आणि मूळ गुंतवणूक न देता सर्वांची फसवणूक केली.
याप्रकरणी राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शिर्डी पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे गुह्याचा तपास करीत आहेत. दरम्यान, गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्यात महाराष्ट्र सरकार ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण (एमपीआयडी) कायद्यानुसार तपासी अधिकारी युवराज आठरे यांनी प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. या गुन्ह्यात सहा संस्थांसह आरोपींच्या मालमत्ता व बँक खाते जप्त करण्याचा आदेश शासनाने दिले आहेत. त्यात जप्त केलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिर्डी विभागाच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची ’सक्षम प्राधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी शासनाने कठोर पाऊल उचलले आहे. जप्त मालमत्तेची लिलाव प्रक्रिया पार पाडून ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, या गुन्ह्यात आतापर्यंत मुख्य आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे (रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी), संदीप भास्कर सावळे (रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी) व सुबोध सुकदेव पाटील (रा. साईप्रसादनगर, शिर्डी) यांना अटक करण्यात आली आहे.
पतसंस्था, एलआयसीमधील ठेवी जप्त
ग्रो-मोअर कंपनी, भूपेंद्र सावळे, संदीप सावळे, भाऊसाहेब थोरात, मयुरी किरणा ॲण्ड जनरल स्टोअर, राजाराम सावळे, सुबोध सावळे, अरूण नंदन, आयुराज बिल्डकॉन, सीमा नंदन, इनोव्हेटिव टच सोल्युशन, पूजा गोकूळ पोटिडे यांचे विविध बँकातील 34 खात्यातील रक्कम जप्त करण्यात आले आहे. तसेच, पतसंस्थांमधील 5 मुदत ठेवीच्या रक्कमा, एलआयसीमधील 6 खातीवरील रक्कम जप्त करण्यात आली आहेत.
या संस्थांच्या मालमत्ता जप्त
ग्रो-मोअर फिनकेअर सर्व्हिसेस प्रा.लि. (ठाणे), ग्रो-मोअर इनव्हेस्टमेंट (शिर्डी), ग्रो-मोअर फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रा.लि., ग्रो-मोअर फायनान्शिअल फोर्टीट्युड, ग्रो-मोअर वेल्थ मॅनेजमेंट आणि स्वराज्य कॅपिटल प्रा.लि.
आरोपींच्या ‘या’ मालमत्ता जप्त
आरोपी भूमेंद्र सावळे याची शिर्डी येथील शेतजमीन, राहते घर, शिरसगाव (श्रीरामपूर) येथील प्लॉट, भाऊसाहेब आनंदा थोरातचे शिर्डी येथील राहते घर, राजाराम भटू सावळे याची शिर्डी येथील शेतजमीन, नांदुर्खी (ता.राहाता) शेथील शेतजमीन.
सोने व रोकड जप्त
आरोपींनी विविध बँकांमध्ये तारण ठेवलेले 84 लाख 81 हजार 977 रुपयांचे सोने जप्त जप्त करण्यात आले आहे. तसेच गुन्ह्यात जप्त करण्यात आलेलेली 85 हजारांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.