

नगर: उन्हाचा तडाखा वाढला असून, पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांची संख्या वाढू लागली आहे. चार तालुक्यांतील 26 गावे आणि 120 वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसल्या आहेत. या गावांतील 44 हजार 152 लोकसंख्येला शासनाच्या वतीने 20 टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 8 टँकर धावत आहेत.
गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. धरणे, तलाव आदी ओव्हरफ्लो झाले. नद्या, नाले दुथडी भरुन वाहिले गेले. त्यामुळे भूजलपातळीची चांगली नोंद झाली होती. त्यामुळे रब्बी हंगामी पिके जोरात आली. पावसाची परिस्थिती उत्तम असली तरीही एप्रिल महिना आला की, संगमनेर, नगर, पारनेर, पाथर्डी आदी तालुक्यांना पाणीटंचाईच्या झळा सुरु होतात.
त्यानुसार यंदा अकोले तालुक्यातून पहिल्यांदा टँकरची मागणी झाली. गेल्या महिन्यापासून या तालुक्यातील 2 गावे आणि 6 वाड्यांसाठी 1 टँकर सुरु आहे. संगमनेर तालुक्यात टंचाई परिस्थिती अधिक आहे. या तालुक्यातील 12 गावे आणि 22 वाड्यांत पाणीटंचाई निर्माण झालेली असून 16 हजार 804 नागरिक टँकरच्या पाण्यासाठी रांगा लावत आहेत.
नगर तालुक्यातील 3 गावे आणि 12 वाड्यांतील 5 हजार 677 लोकसंख्येचा घसा कोरडा असून, 3 टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु आहे. पारनेर तालुक्यातील 9 गावे आणि 80 वाड्यांतील 20 हजार 500 लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर आहे. या तालुक्यात 5 टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत 56 टँकर कमी
गेल्या वर्षीच्या या कालावधीत सात तालुक्यांत 76 टँकर धावत होते. यामध्ये संगमनेर तालुक्यातील 18, अकोल्यातील 1, नगर तालुक्यातील 9, पारनेर तालुक्यातील 21 आणि पाथर्डीं तालुक्यातील 23 शेवगाव तालुक्यातील 1, कर्जत तालुक्यातील 3 टँकरचा समावेश होता. यंदा परिस्थिती बरी असून, फक्त चार तालुक्यांत टँकर सुरु आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या 20 टँकर धावत आहेत.