

घारगाव : अकोले तालुक्यातील पठार भागात बेलापूर गावाजवळ बिबट्याच्या हल्ल्यात आदिवासी तरुणाचा मृत्यू झाल्याचे रविवारी (दि.21) सकाळी उघडकीस आले. पप्पू बाळू दुधवडे (वय 22, रा.ब्राह्मणदरा म्हसवंडी ता.संगमनेर) असे या तरुणाचे नाव आहे. (Latest Ahilyanagar News)
पप्पू दुधवडे हा आदिवासी तरुण बांधकाम कामगार होता. तो आई-वडील व एक भाऊ आणि भावजयी यांच्यासह शेतमजुरीही करत होता. पप्पू शनिवारी सकाळी सात वाजता घरातून मजुरीसाठी दुचाकीवरून बेलापूर येथे गेला होता. रात्री घरी परतत असताना त्याच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने रस्त्यातील ओळखीच्या घराजवळ दुचाकी उभी करून तो पायी घराकडे जात होता, त्या वेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. शरीराचे लचके तोडलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडल्याने बिबट्यानेच त्याचे लचके तोडले असावेत, असे सांगण्यात आले.
रविवारी सकाळी सातच्या सुमारास रवींद्र दुधवडे हा आदिवासी तरुण मजुरीसाठी बदगी-बेलापूर रस्त्याने बेलापूर गावाकडे जात होता. त्या वेळी मल्हारवाडी येथील भिसे वस्तीजवळ डांबरी रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आला. रवींद्रने तातडीने गावचे पोलिस पाटील केशव त्रिभुवन, भगवानदादा काळे यांना माहिती दिली. त्यांनी अकोले पोलिस व वन विभागाला कळविले. वनपरिक्षेत्र अधिकारी ए. सी. पाटील, वनरक्षक दीपक शिंदे, सुनील शिर्के, नितीन वारे, एस. के. बढे, आर. एस आंबरे, बहिरू बेनके, सुनील कुकडवाळ, दीपक गवारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तत्काळ वेगवेगळ्या ठिकाणी पिंजरे लावण्यात आले.
अकोल्याचे पोलिस उपनिरीक्षक व्ही. टी. घोडे, हेडकॉन्स्टेबल बापूराव देशमुख, जे. जे. ठिकेकर यांनीही घटनास्थळ जाऊन पंचनामा केला. मृतदेह खासगी रुग्णवाहिकेतून कोतूळ येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, घटनास्थळाजवळील वस्तीवरील रहिवाशांनी सतर्क राहावे. अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
जुन्नरचे बिबटे बेलापूर परिसरात..
बेलापूर परिसरात बिबट, तरस, कोल्हे, लांडगे अशा जंगली प्राण्यांचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जुन्नर तालुक्यात (पुणे) नरभक्षक बिबटे पकडून अकोले तालुक्याच्या वनक्षेत्रात सोडले जात असल्याचा आरोप तेथील रहिवाशांनी केला आहे. माणसावर बिबट्याच्या हल्ल्याची पठार भागातील ही पहिलीच घटना असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बेलापूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने या नरभक्षक बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे, जुन्नर परिक्षेत्रात पकडलेले बिबटे या भागात न सोडता घनदाट जंगलात सोडावेत, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्या बेलापूरचे भगवानदादा काळे, राहुल लांडे, भास्कर भिसे, म्हसवंडीचे सरपंच मंगेश बोडके आदींनी केली आहे.