

पाथर्डी : तालुक्यातील शिरापूर येथे शनिवारी सायंकाळी अतुल रावसाहेब शेलार (वय 31, रा. शिरापूर) हा तरुण नदीला आलेल्या पुरात वाहून गेला. त्याचा शोध दुसर्या दिवशी रविवारीही लागला नाही. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Ahilyanagar News)
तिसगाव-शिरापूर-घाटशिरस रस्त्यावर असलेल्या नदीचे पाणी शनिवारी रात्री पुलावरून वाहत होते. गावातून काम करून परत जाताना अतुल शेलार पूल ओलांडताना तोल जाऊन पाण्यात अडकला आणि काही क्षणातच वाहून गेला. तहसीलदार उद्धव नाईक, पोलिस निरीक्षक विलास पुजारी व पाथर्डी नगरपरिषद अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. शनिवारी रात्री आणि रविवारीही अहिल्यानगर अग्निशमन दल व महसूल विभागाने शोधमोहीम राबवली, मात्र प्रयत्न निष्फळ ठरले. रविवारी सायंकाळी परिसरात पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने शोधमोहीम थांबली होती.
टाकळी मानूर येथील गणपत हरीभाऊ बर्डे (वय 65) हे 15 सप्टेंबर रोजी घाटशीळ पारगाव तलावात वाहून गेले होते. आठ दिवस उलटूनही त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. मागील आठवड्यापासून तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे.
डोंगर भागात झालेल्या पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. शेतजमिनी वस्तीभागाला पाण्याचा फटका बसत असून शनिवारी शिरापूर नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर ही दुर्दैवी घटना घडली. शिरापूर येथील तरुणाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने अजून अधिकच्या टीमला पाचरण करावे, अशी मागणी बाबासाहेब बुधवंत यांनी केली आहे.
पाथर्डी : अहिल्यानगर महापालिका अग्निशमन दलाचे बचाव पथक पाण्यात वाहून गेलेल्या अतुल शेलार याचा बोटीतून शोध घेत आहे.