

एकरूखे: शिकारीच्या मागे पळणार्या बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. सुमारे एक वर्ष वयाचा बिबट्या होता. राहाता तालुक्यातील चितळी शिवारातील गिताराम चौधरी यांच्या शेतातील विहिरीत ही घटना घडली. जालिंदर शेळके व सागर शेळके यांची शेती चौधरी यांच्या शेजारी आहे. दोघेजण रविवारी दुपारी शेतात गेले होते. (Latest Ahilyanagar News)
चौधरी यांच्या विहिरीत सहज ते डोकावले असता, त्यांना बिबट्या पाण्यावर तरंगताना दिसला. त्यांनी चौधरी यांना, मोबाईल कॉल करून, बिबट्या विहिरीत पडला आहे, असे सांगितले. ही माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे, वनरक्षक राहुल कानडे व वनरक्षक सविता थोरात यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
पशु वैद्यकीय अधिकारी सानप यांनी मृत बिबट्याचे पोस्टमार्टम केले. यानंतर मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गिताराम चौधरी, संपत लहारे, जालिंदर शेळके, सागर शेळके, विष्णू राशिनकर, भाऊसाहेब साखरे आदी उपस्थित होते.