

संगमनेर : तालुक्यातील मिरपूर येथील शेतकरी अनिल गणपत आहेर यांच्यावर धारदार शास्त्राने प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या दीपक पोकळे याच्या अटकेसाठी गावकर्यांनी रास्तारोको केला. आठ दिवस उलटून पोलिसांना आरोपी सापडत नसल्याने गावकर्यांनी पोलिसांच्या कर्तव्यावर नाराजी व्यक्त केली. संतप्त ग्रामस्थांनी रविवारी मोर्चा काढून निषेध व्यक्त करत तातडीने आरोपीला अटक करण्याची मागणी केली.(Latest Ahilyanagar News)
संगमनेर तालुक्यातील मिरपूर येथील शेतकरी अनिल गणपत आहेर 12 सप्टेंबरच्या रात्री आठ वाजेच्या सुमारास लोहारे गावातील डेअरीत दूध घालुन दुचाकीवरून घरी जात होते. गावातील सराईत गुन्हेगार दिपक पोकळे याने धारदार शस्त्राने आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पसार झाला. हल्यात गंभीर जखमी आहेर यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
संगमनेर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर दिपक पोकळे फरार होऊन दहा दिवस उलटून गेले तरी अद्याप पोलिसांना त्याचा शोध लागलेला नाही. संतप्त मिरपूर लोहारे तसेच परिसरातील शेतकरी रविवारी आक्रमक झाले आहे. दोन दिवसात दीपक पोकळेला अटक केली नाही तर सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन संगमनेर शहरात रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
नाशिक राष्ट्रवादी ओबीसी सेल अध्यक्ष सुरेश आव्हाड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय फड, विश्वास मुर्तडक, शांताराम कर्पे, सूर्यभान गोरे आदींचं पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. हल्लेखोर सराईत गुन्हेगार दीपक पोकळे याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात खून, खुनी हल्ले, दरोडे, खंडणी, मारहाण करून लूटमार, अपहरण अशा प्रकारच्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
एका अपहरणाच्या गुन्ह्यात दीपक पोकळेवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून, या गुन्ह्यात सध्या तो जामिनावर बाहेर आहे. पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालून त्याचा जामीन रद्दसाठी प्रयत्न करून त्यास अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
दीपक पोकळे विरोधात संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिस त्याच्या मागावर आहेत. त्याच्याविषयी कोणाकडे काही माहिती असले तर ती कळवून पोलिसांना सहकार्य करावे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांची शोधाशोध सुरू आहे.
सोलोमन सातपुते, पोलिस उपनिरीक्षक