

संगमनेर: संगमनेर नगरपालिकेच्या पार पडलेल्या निवडणुकीत शहरातील अनेक प्रभागांत काही मतदारांची नावे दुबार नोंद झाल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच संबंधित प्रभागांतील दुबार मतदार नोंदींचा गंभीर प्रश्न महायुती पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यामुळे दुबार नोंद असलेल्या मतदारांची पडताळणी करावी, अशी मागणी शिवसेना महायुतीच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत शिवसेना महायुतीच्या वतीने प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपालिका निवडणुकी दरम्यान दुबार मतदारांबाबत तक्रार केल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीप्रमाणेच निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल, असे स्पष्टीकरण देण्यात आले होते. प्रत्यक्षात शहरातील काही प्रभागांत ग्रामीण भागातील मतदारांची नावे समाविष्ट झाल्याचे स्पष्टपणे आढळून आले आहे.
संबंधित मतदारांची नावे त्यांच्या मूळ गावातील मतदार यादीत देखील नोंद असल्याचे कागदोपत्री सिद्ध होत असल्याची बाब महायुतीच्या वतीने निदर्शनास आणून देण्यात आली आहे. अनेक ग्रामीण भागातील मतदारांनी नगरपालिका निवडणुकीत शहरात मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे.हीच परिस्थिती आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुबार मतदानाची नोंद होणे ही बाब लोकशाही प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. तरी दुबार मतदार नोंदणी असलेल्या मतदारांबाबतचा तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी महायुतीच्या वतीने करण्यात येत होती.
दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाने दुबार मतदार नोंदींची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आवश्यक निर्देश प्राप्त होताच तालुका स्तरावर दुबार मतदारांची सखोल पडताळणी करण्यात यावी व संबंधित मतदारांच्या नावांबाबत योग्य व कायदेशीर निर्णय घेण्यात यावा, अन्यथा, कायदेशीर मार्गाचा अवलंब करून न्याय मागावा लागेल, असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे, उपजिल्हाप्रमुख रमेश काळे, ऋषिकेश मुळे, अजित जाधव, सौरभ देशमुख, अनिकेत चांगले, महेश उदमले, शशांक नमन, वरद बागुल, पुनम दायमा, दिपाली वाव्हळ, पुनम अनाप, सागर भोईर, मुकेश मुर्तडक, शशिकांत दायमा, अक्षय वर्पे, रवींद्र बोऱ्हाडे यांच्यासह शिवसेना महायुतीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.