

नगर: गेल्या 22 वर्षांपासून सत्ताधारी-विरोधकांमधील घोषणाबाजी, आरोप प्रत्यारोप, माईक खेचाखेची, शाब्दीक बाचाबाची, यामुळे पोलिस बंदोबस्तात वादळी ठरणारी माध्यमिक शिक्षक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा काल मात्र शांततेत, खेळीमेळीत पार पडल्याचे दिसले. यावेळी सभासदांनी सर्व विषय एकमताने मंजूर केले.
जिल्ह्यातील सुमारे 11 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सभासद यांची कामधेनू असलेल्या अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीची 82 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. (Latest Ahilyanagar News)
सभेच्या प्रारंभी जिल्हा सहकारी मंडळाच्या व्ही.ए. मानकर यांनी कार्यशाळा घेऊन उपस्थितांना सहकार खात्यातील विविध तरतुदी, कलमांची माहिती व कायदे संदर्भात मार्गदर्शन केले. अध्यक्षीय सूचना संचालक महेंद्र हिंगे यांनी मांडली. सुनील दानवे यांनी त्याला अनुमोदन दिले. राष्ट्रगीताने सभेला सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविकात अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे म्हणाले की, काटकसरीने संस्थेचा कारभार सुरू असून, संस्थेचा विकासात्मक दृष्टिकोन ठेऊन संचालक मंडळ कारभार करणार आहे. माध्यमिक शिक्षक सोसायटीने गेल्या आर्थिक वर्षात 7 % या अल्प दराने 995 कोटीचे कर्ज वाटप केले असून, सर्व आवश्यक त्या तरतुदी करून 9 कोटी 89 लाखाचा नफा मिळवला आहे.
मागील आर्थिक वर्षामध्ये बँकेचा कॅश क्रेडिटचा व्याजदर वाढलेला असून देखील मागील आर्थिक वर्षापेक्षा यावर्षी बँक कॅश क्रेडिटची उचलही वाढल्या कारणाने कॅश क्रेडिटचे व्याज हे रुपये 3 कोटी 25 लाख इतके कॅश क्रेडिट पोटी जास्तीचे गेलेले असल्याचे स्पष्ट करुन लाभांशात वाढ दिली गेली नसल्याचे स्पष्ट केले.
सचिव स्वप्निल इथापे यांनी मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. संस्थेच्या कामकाजाविषयीचा अहवाल वाचून मंजूर करण्यात आला. संचालक बाबासाहेब बोडखे यांनी ताळेबंद व नफा तोटा पत्रकाचे वाचन करुन पारदर्शक पध्दतीने कारभार करण्यासाठी ऑडिट रिपोर्ट सर्व सभासदांपुढे मांडण्यात आला असल्याचे सांगून ऑडिटरचा खर्च देखील कमी केले जाणार असल्याची सांगितले. तसेच 2 कोटी 47 लाख रुपये गुंतवणुक करुन राबविण्यात येत असलेल्या उत्तम जिंदगी या योजनेची माहिती दिली.
सभासदांपैकी देविदास खेडकर यांनी उत्तम जिंदगी सभासदांसाठी फायद्याची कशी? व ऑडीटर खर्चा संदर्भात प्रश्न उपस्थित केला. यावर अध्यक्ष शिंदे यांनी शासनाच्या परिपत्रकानुसार ही योजना अंमलात आणली आहे. सुधारित एनपीए, कर्जावर तरतूद, या योजनेतील सर्व रक्कम व्यवहारात राहणार असल्याची माहिती दिली.
तर ऑडिटरचा 10 लाखांनी खर्च कमी करण्यात आला आहे. यापुढे देखील हा खर्च कमी करुन ते पुढील अहवालात सभासदांना दिसणार असल्याचे सांगितले. यावेळी रामराव धनवटे, रामदास जंजिरे, इस्माईल शेख, संदीप पानमळकर, गणेश विखे आदींनी सभेत प्रश्न उपस्थित करून विविध सूचना मांडल्या. या प्रश्नांना संचालक मंडळाच्या वतीने समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.
सभेपुढे असलेले 2025-26 चे अंदाजपत्रक मंजूर करणे, 2024-25 वैधानिक व अंतर्गत लेखापरिक्षकांचा अहवाल वाचून त्याची नोंद घेणे, लेखा परिक्षणाच्या दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे, अहवालात सुचविल्याप्रमाणे उपविधी दुरुस्तीबाबत विचार करुन संमत करणे, 2025-26 सालासाठी वैधानिक व अंतर्गत लेखापरिक्षकाची नेमणुक करणे हे सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
पुरोगामी मंडळाच्या बहिष्काराने शांतता?
पुरोगामी मंडळाने लाभांशच्या मुद्द्यावरून सत्ताधार्यांना घेरले होते. त्यामुळे सभा वादळी ठरेल अशी चर्चा होती. मात्र सभेपूर्वी एक दिवस अगोदर त्यांनी सभेवर बहिष्कार टाकला. परिणामी कालच्या सभेत विरोधक हा सभागृहात कुठेच दिसला नाही.. पुरोमागीच्या या भूमिकेमुळेच सभा शांततेत, खेळीमेळीत पार पडल्याचेही सभीस्थळी चर्चा झाल्याचे दिसले.
म्हणून संस्थेतील फोटो हटवलेः बोडखे
माध्यमिक शिक्षक सोसायटीत देशाचे, राज्याच्या नेत्यांचे फोटो होते, या नेत्यांचा आमच्या मनात आदर आहे. मात्र या नेत्यांच्या फोटोसमवेत ज्यांच्यावर नोकरभरती घोटाळ्याचे आरोप आहेत, ज्यांनी सेवानिवृत्तीनंतरही हट्टीपणाने कारभार हाकून संस्थेचे नुकसान केले, सहकारातील नितीमुल्ये पायदळी तुडवले, अशा प्रा. भाऊसाहेब कचरे यांचा फोटो असल्याने ते आमच्या संचालकांना आवडले नाही.
त्यामुळे ते फोटो आम्ही काढले व छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्या ठिकाणी लावला, अशी भूमिका सभेनंतर परिवर्तन मंडळाचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी एका प्रश्नावर मांडली. यावेळी लाभांश कमी मिळाला त्यालाही मागील सत्ताधार्यांचा चुकीचा कारभार जबाबदार असल्याचे सांगून त्यांनी 2008-09 मध्ये पाच टक्के लाभांश वाटल्याची आठवण करून दिली.
आप्पासाहेब शिंदे सभासदांसमोर नतमस्तक
ठेवीमध्ये वाढ करण्यासाठी ठेवी वाढवा अभियान सुरू केले जाणार आहे. सोसायटीचे कारभार हातात घेतल्यापासून काटकसरीने काम सुरु करण्यात आले असून, मागील वर्षीच्या वार्षिक सभेत हॉलच्या निम्म्या रकमेत हॉल भाड्याने घेतले. तर अहवाल छपाईसाठी देखील दीड लाखा पर्यंत खर्च वाचविण्यात आला असल्याचे सांगितले. तर सर्व सभासदांनी विश्वास टाकून बहुमताने सोसायटीची सत्ता ताब्यात दिल्याबद्दल व्यासपिठावर आप्पासाहेब शिंदे नतमस्तक झाल्याचे दिसले.