

नेवासा: नेवासा नगरपंचायत हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले तब्बल 1 कोटी 54 लाख रुपयांचे अनुदान लवकरच त्यांच्या बँक खात्यांवर वर्ग होणार असल्याची माहिती आमदार विठ्ठल लंघे यांनी दिली.
नेवासा नगरपंचायतीला पहिल्या टप्प्यात 324 घरकुले मंजूर झाली होती. यामध्ये 182 घरकुलांचे काम पूर्ण झाले असून, 142 घरकुले प्रगतिपथावर आहेत. या सर्व घरकुल लाभार्थ्यांचे प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्प्यातील अनुदान रखडले होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार लंघे यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रत्यक्ष निवेदन दिले. (Latest Ahilyanagar News)
यावेळी शिंदे यांनी म्हाडा अधिकार्यांना तत्काळ आदेश देऊन कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानुसार ही रक्कम म्हाडामार्फत लवकरच नगरपंचायतीकडे वर्ग होणार आहे. त्यानंतर थेट लाभार्थ्यांच्या खात्यांवर जमा होईल.
याशिवाय, दुसर्या टप्प्यातील 44 नव्या घरकुल प्रकल्पांनाही मंजुरी मिळाली आहे. त्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. दरम्यान, तुकडेबंदी कायद्यामुळे निर्माण झालेली अडचण महसूलमंत्री बावनकुळे यांनी तुकडेबंदीतील अट शिथिल करून घरासाठी आवश्यक जागा खरेदी करण्यास परवानगी दिली आहे.
घरकुलाचे स्वप्न आता प्रत्यक्षात
प्रधानमंत्री आवास योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशातील सर्वसामान्यांसाठीची महत्त्वाकांक्षी योजना आहे. यामार्फत प्रत्येकाला आपले घर मिळावे, हा सरकारचा उद्देश आहे. तुकडे बंदीची अट शिथिल करण्याच्या निर्णयामुळे अनेकांचे घरकुलाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू शकणार आहे. रखडलेली कामे पूर्णत्वास जातील, असा विश्वासही आमदार लंघे यांनी व्यक्त केला.