

नगर: जिल्ह्यात आज अखेर 32 टक्के तुटीच्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप पिके अडचणीत आली आहेत. मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाची नोंद उत्तम झाल्यामुळे जिल्ह्यातील ल जवळपास सर्वच धरणे सरासरी 75 टक्के भरली आहेत. जायकवाडी धरण दीड महिन्यांत 82 टक्के भरले आहे.
जुलैअखेर हे धरण भरण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, या धरणातील उपयुक्त पाणीसाठा 75 टक्क्यांपेक्षा अधिक नोंदविला गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात समाधानाचे वातावरण पसरले आहे. (Latest Ahilyanagar News)
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दीड महिन्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदा पहिल्या दीड महिन्यांतच भंडारदरा, मुळा, निळवंडे धरणे 70 टक्के भरुन नदीपात्रांत विसर्गही सोडण्यात आला आहे. याशिवाय आढळला व सीना धरण शंभर टक्के भरले आहे. येत्या काही दिवसांत पाऊस झाल्यास ही धरणे जुलैअखेर ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.
मात्र, धरणांच्या लाभक्षेत्रात म्हणावा असा दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे अद्याप दहा ते पंधरा टक्के खरीप पेरणी बाकी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 149 मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना फक्त 110 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पेरणी झालेल्या पिकांच्या वाढीसाठी दमदार पावसाची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकर्यांचे आभाळाकडे लक्ष लागले आहे.
जायकवाडी धरणाची क्षमता 102 टीएमसी इतकी आहे. चार महिन्यांत जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 65 टक्के भरणे गरजेचे आहे. रविवारी (दि.13) सायंकाळी सहा वाजता या धरणातील उपयुक्त पाणीसाठा 75 टक्के म्हणजे 57.82 टीएमसी इतका झाला आहे. त्यामुळे यंदा समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्न निकाली निघाला आहे. हे धरण आजमितीस 82 टक्के भरले असून सध्या धरणात एकूण 83.89 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.