Mula Dam News: 'मुळा'च्या आवर्तनाने 32 हजार हेक्टरला संजीवनी; लाभक्षेत्रातून पाऊस गायब

दोन्ही कालव्यांद्वारे शेतकर्‍यांना दिलासा
Rahuri News
'मुळा'च्या आवर्तनाने 32 हजार हेक्टरला संजीवनी Pudhari
Published on
Updated on

राहुरी: मान्सून सुरू असतानाही पावसाने हुलकावणी दिल्याने नैराश्यात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी मुळा धरणाचे आवर्तन संकटमोचक ठरल्याचे दिसून आले आहे. तांत्रिकदृष्ट्या भरलेल्या मुळा धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू असतानाच शेतकर्‍यांसाठी डावा व उजव्या कालव्याचेही आवर्तन सोडले गेल्याने राहुरी परिसरातील 32 हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांना बळ मिळाले आहे.

मुळा धरणाचा पाणी साठा 18 हजार 200 दलघफू होताच धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडत पाणी सोडले गेले होते. परंतू गेल्या तीन ते चार दिवसांपासून लाभक्षेत्राप्रमाणेच पाणलोट क्षेत्रावरही पावसाने दडी मारली. परिणामी मुळा धरणाकडे होणारी नविन पाण्याची आवक अत्यल्प होत आहे. मुळा धरणाकडे काल दि. 13 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता केवळ 1 हजार 393 क्यूसेक प्रवाहाने नविन पाण्याची आवक होत होती. (Latest Ahilyanagar News)

Rahuri News
Vitthal Langhe News: घरकुलांचे दीड कोटी लवकरच; आमदार विठ्ठल लंघे यांच्या पाठपुराव्याला यश

त्यापैकी धरणाच्या दरवाज्यातून 1 हजार क्यूसेक प्रवाहाने जायकवाडीच्या दिशेने मुळा नदी पात्राचा प्रवाह वाहत आहे. तर मुळा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याद्वारे शेती सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी डावा कालवा 15 क्यूसेक प्रवाह तर उजवा कालवा 400 क्यूसेक प्रवाहाने वाहत आहे. दोन्ही कालवे वाहते झाल्याने शेतकर्‍यांच्या खरीप पिकांना आवर्तनाचे टॉनिक लाभदायी ठरणार आहे.

डाव्या कालव्याच्या आवर्तनातून राहुरी तालुक्यातील शेती क्षेत्र तर उजव्या कालव्यावर राहुरीसह नेवासा, शेवगाव, पाथर्डी परिसरातील शेती क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे. मुळा धरणाचा पाणी साठा सद्यस्थितीला 18 हजार 226 दलघफू इतका स्थिर ठेवण्यात आला आहे.

शासनाच्या जलाशय परिचलन सूची अनुसार 15 जुलै ते 31 जुलै या कालावधीत धरण साठा 21 हजार 809 दलघफू इतका स्थिर राखले जाणार आहे. त्यामुळे लवकर मुळा धरणाचे दरवाजे बंद केले जाणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, राहुरी परिसरात खरीप 100 टक्के खरीप पेरणी पूर्ण झालेली आहे. यामध्ये शेतकर्यांनी कपाशी पीक 18 हजार 400 हेक्टर क्षेत्रावर पेरणी केलेले आहे. बाजरी 3 हजार हेक्टर, सोयाबीन 4 हजार 800 हेक्टर क्षेत्र, मका 6 हजार हेक्टर क्षेत्र, तूर 450 हेक्टर क्षेत्र, मूग व उडिद 90 हेक्टर तर भुईमूग 150 हेक्टर क्षेत्र अशी पेरणी झालेली आकडेवारी कृषी विभागाने दिली आहे. राहुरी परिसरात एकूण 32 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाल्याने 100 टक्के उद्दीष्ट्य पूर्ण झालेले आहे.

Rahuri News
Municipal Elections 2025: बारा पालिकांमधून निवडले जाणार 289 नगरसेवक; सदस्यसंख्या राजपत्रात प्रसिध्द

परंतू पेरणी 100 टक्के होऊनही पावसाने दिलेली हुलकावणी शेतकर्यांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. शेतकर्यांच्या खरीपाला पाण्याची नितांत गरज असताना मुळा धरणाने संकटमोचक म्हणून मदतीचा हात दिला असल्याची भावना व्यक्त होत आहे. मुळा धरणाचा डावा व उजवा कालव्याचे आवर्तन सोडण्यात आलेले आहे.

डावा कालवा 15 क्यूसेकने वाहता आहे. डावा कालव्याची दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण होणार असून आज (दि.14 जुलै) पासून कालवा पूर्ण क्षमतेने सोडला जाईल अशी अपेक्षा शेतकर्‍यांना आहे. त्यासह उजव्या कालव्याचेही आवर्तन सुरू असून आवर्तन प्रवाह वाढण्याची अपेक्षा आहे.

..तर खरीपाचे मोठे नुकसान

राहुरी परिसरामध्ये पावसाने आठवड्यापासून थांबा घेतला आहे. शेतकर्‍यांनी मोठ्या अपेक्षेने खरीप पेरण्यांना बळ दिले आहे. परंतु पाऊस नसल्याने खरीप पीकांचे नुकसान होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आषाढी सरींची कृपा व्हावी म्हणून प्रार्थना केली जात आहे.

मागणीनुसार आवर्तन देण्यासाठी तत्परता

मुळा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून आवर्तन प्रारंभ झालेला आहे. शेतकर्‍यांच्या अपेक्षेनुसार दोन्ही कालव्यातून आवर्तन देण्यासाठी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील, शाखाभियंता राजेंद्र पारखे यांच्याकडून धरण व कालवा स्थळी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. लवकरच शेतकर्यांच्या मागणीनुसार मुळा पाटबंधारेकडून आवर्तन लाभ दिले जाईल, अशी अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news