

अहिल्यानगर : ॲकॅडमीतील विद्यार्थ्यांचे भांडण सोडविण्यास गेलेल्या शिक्षकालाच मारहाण करण्यात आल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर रोडवर शुक्रवारी (दि. 3) रात्री घडला.जखमी शिक्षकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.(Latest Ahilyanagar News)
अमृत सुरेश काळे (रा.मंगरूळ, जुन्नर,हल्ली नगर) असे जखमी शिक्षकाचे नाव आहे. त्यांनीच पोलिसांत तक्रार दिली आहे. काळे हे गरूड झेप ॲकॅडमीत शिक्षक आहेत. ॲकॅडमीपासून जवळच ते कुटुंबीयांसह राहतात. शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास तुषार पाखरे व राहुल केदार यांनी फोनवरून ॲकॅडमीत सुरज बनसोडे हा मारहाण करत असल्याचे कळविले. काळे यांनी ॲकॅडमीत जातानाच आकाश कोद्रे व दत्तात्रय निमसे यांना घटनेची माहिती दिली.
मुलांना का मारतो, अशी विचारणा करताच बनसोडे बॅट घेऊन त्यांच्यावर धावून गेला. ‘तुमचा काही संबंध नाही, मध्ये बोलला तर तुम्हाला मारेन’, अशी धमकी त्याने काळेंना दिली. त्यानंतर बनसोडे याने फोन करून चार/पाच जणांना बोलावून घेतले. इतरांनी काळे यांना धरले तर सुरज बनसोडे याने लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस केस केली तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
ॲकॅडमीतील विद्यार्थी ऋषिकेश जाधव, राहुल केदार, रोहित आडके यांनी काळे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे बनसोडे व इतर मारहाण करणारे आले. काळे सरांचा दुचाकी अपघात झाला, अशी माहिती द्या नाहीतर तुम्हालाही जीवे मारून टाकेल, अशी धमकी देत निघून गेले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी डॉक्टरांना अपघात झाल्याची माहिती दिली, परंतू काळे यांनी पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला.