

गणोरेः अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी, विरगाव व जवळे कडलग या तीन गावांमध्ये एकाच रात्री सलग चोरीच्या घटना घडल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.(Latest Ahilyanagar News)
तिन्ही गावांच्या सुपारमाळ डोंगरावर रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास खंडोबा मंदिराचे दरवाजे तोडून चोरट्यांनी दानपेटी फोडून रोकड लंपास केली. चोरी करण्यापर्वू मंदिर परिसरातील सीसीटीव्ही चोरट्यांनी लोखंडी रॉड फोडला. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पहाटे दत्तात्रय हासे मंदिरात आरतीसाठी आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले.
सकाळी पोलिस निरीक्षक, पोलिस पाटील व सरपंचांनी चोरी गेलेल्या साहित्याची माहिती घेतली. दरम्यान, याच रात्री विरगाव येथील दुकान फोडून चोरट्यांनी रोकड लंपास केली. एक दुरचाकी चोरुन नेली. जवळे कडलग येथील आढळेश्वर मंदिरात चोरट्याने प्रवेश केला. येथील वृद्धेच्या खोलीला कडी लावून, तिला कोंडले.
दानपेटी फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. धान्याच्या गोण्या चोरट्यांनी लंपास केल्या. सीसीटीव्हीचे नुकसान केले. खंडोबा व आढळेश्वर या दोन्ही मंदिरातील सीसीटीव्हीत चोरीच्या घटना कैद झाल्या आहेत. चोरीच्या या घटनांनंतर ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रणेते डी. के. गोरडे म्हणाले की, ग्रामस्थांनी सतर्क रहावे. गावात आलेल्या अनोळखी व्यक्तीची चौकशी करावी, असे ते म्हणाले.