

अहिल्यानगर : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीनंतर लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर केडगावच्या पानटपरीत व अरणगावच्या लॉजवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.(Latest Ahilyanagar News)
जहीद फारूख तांबोळी (रा. केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. भंडारा जिल्ह्यातील तरुणीने कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. चार वर्षांपूर्वी तिची जहीदशी सोशल मीडियावर ओळख झाली. तेव्हापासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. तरुणी नागपूर येथून खासगी बसने नोकरी शोधण्यासाठी पुणे येथे 2024मध्ये गेली होती. बसमधून पेरणे फाटा येथे तिला उतरून घेत जहीद तिला भेटण्यासाठी गेला होता. पुढे तरुणीला कंपनीत नोकरी मिळाली. आपण दोघे लग्न करू असे जहीदने तिला सािंगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत त्याला होकार दिला.
जहीदच्या सांगण्यानुसार तरुणी 16 सप्टेंबर 2025च्या पहाटे अहिल्यानगरात आली. तिला घेऊन जहीद दुचाकीवरून केडगावच्या एका पानटपरीत गेला. तेथे त्याने बळजबरीने शरीरसंबंध केले. तरुणीला पानटपरीत झोपवून तो बाहेरून कुलूप लावून गेला. 28 सप्टेंबरला त्याने तरुणीला अरणगाव रोडवरील लॉजवर नेत तेथेही अत्याचार केला. लग्नाची विचारपूस करता त्याने तरुणीला पुढे पाहू आता पुण्याला जा, असे सांगत दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. लग्नासाठी टाळाटाळ केल्याने तरुणीने पोलिसांत धाव घेत गुन्हा नोंदविला.
ती एकटीच पानटपरीत
जहीद हा पानटपरीत तरुणीवर दररोज अत्याचार करत होता. आठवडाभर हा प्रकार सुरू होता. त्यानंतर लॉजवरही त्याने तिच्यावर अत्याचार केला. लग्नाविषयी विचारणा करताच त्याने तिला शिवीगाळ करत दमदाटी केली. तो लग्न करत नसल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.