

राहुरी : राहुरी पोलिसांनी, तब्बल 90 व्या अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध लावून, ‘ऑपरेशन मुस्कान,’ यशस्वी राबविले आहे.(Latest Ahilyanagar News)
तालुक्यातील कनगर गावातील अल्पवयीन मुलगी बेपत्ताप्रकरणी राहुरी पोलिसांनी तत्परतेने तपास करुन, मुलीचा यशस्वी शोध लावला. 1 सप्टेंबर रोजी, ‘शिवण क्लासला जाते,’ असे सांगून मुलगी घरातून निघाली होती; मात्र ती घरी परतली नाही. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पालकांनी अपहृत मुलीचा शोध लावण्याची मागणी करीत, उच्च न्यायालयात, ‘हेबीअस कॉर्पस,’ याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेवून, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तपासाला गती दिली. 2 ऑक्टोबर रोजी अपहृत मुलीचा यशस्वी शोध लावून, न्यायालयाच्या आदेशानुसार तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधिक्षक सोमनाथ वाक्चौरे व उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडली. याकामी पोलिस निरीक्षक संजय आर. ठेंगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश वाघमारे, पोलिस हेड कॉंस्टेबल रामनाथ सानप, बाबासाहेब शेळके, पोलिस नाईक प्रविण बागुल, पोलिस कॉंस्टेबल इफ्तेखार सय्यद, मोबाईल सेलचे पोलिस नाईक सचिन धनाड व पोलिस नाईक संतोष दरेकर यांनी परीश्रम घेतले. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश वाघमारे व रायटर पोलिस कॉंस्टेबल इफ्तेखार सय्यद करीत आहेत.
राहुरी पोलिसांची सजगता
या यशस्वी कारवाईमुळे राहुरी पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तब्बल 90 अपहृत अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात राहुरी पोलिसांची सजगता व तत्परता अधोरेखित झाली आहे.