

गोरक्ष शेजूळ
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीपर्यंत डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सयंमाची कौतूक करावे तितके थोडे. निवडणूक प्रक्रियेच्या महिनाभरातील त्यांचा माध्यमांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद पाहता कुठेही त्यांचा तोल घसरल्याचे जाणवले नाही. त्यांच्या याच सयंमाचा सु‘जय’ झाला असे म्हटल्यास वावगे ठरू नये. प्रचार व नंतरच्या कालखंडातील त्यांची संयमी व मुत्सद्दी वक्तव्य भल्याभल्यांना गोंधळात टाकणारी होती. सहकार विकास आघाडीच्या नावाखाली विखे-थोरातांची युती झाली तेव्हाच विखेंना अध्यक्षपद तर थोरातांकडे उपाध्यक्षपद अशी तडजोड झाल्यावर अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले, असेच आता मानले जाते.
जिल्हा बँकेची रणधुमाळी सुरू झाल्यापासूनच सर्वच आपापले आडाखे बांधण्यात दंग होते. नेते मंडळीही जुळवाजुळवीत व्यस्त होती, तर इकडे डॉ. सुजय विखे पाटील यांनी ‘सहकारा’ची निवडणूक हाताळण्याचा ट्रॅक कधी चेंज केला, याचा थांगपत्ताही अनेकांना लागला नाही. जिल्हा बँकेच्या आजवरच्या निवडणुकीत नेहमीच एकमेकांविरोधात लढणाऱ्या बाळासाहेब थोरातांशी जुळवून घेण्याची पहिली चाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी खेळली. त्यांच्या या चालीने अनेकांच्या झोपा उडाल्या. नेमके त्याचवेळी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाखांनी दुष्काळी परिस्थिती व शेतकऱ्यांचे हित पाहता बिनविरोधाची हाक दिली, हाही योगायोगच. गडाख हे अत्यंत शांत, संयमी व विवेकी विचाराचे नेतृत्व असल्याचे आजवर अनेकांनी पाहिले, अभुनवले. त्यामुळे त्यांच्या बिनविरोधाच्या सादला सर्वांनीच प्रतिसाद दिला. तेथून पुढे बिनविरोधाच्या चर्चा सुरू झाल्या, सोबतच सहकारात राजकीय मतभेद बाजूला ठेवण्यावरही एकमत झाले. सहकारातील जाणकार नेतृत्व बँकेत आले तर हिताचेच असेल असाही सूर उमटला.
विखे-थोरात-गडाख यांना सहकारातील मुरब्बीच नव्हे तर जाणकार, जिज्ञासू म्हणून ओळखले जातात. ही तिघे एकत्र आली तेव्हाच जिल्हा बँकेच्या सत्तेची दिशा स्पष्ट झाली होती. त्यातच ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जावई रणजितसिंह देशमुख यांना दूध संघाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देवून निवडणुकीत उतरवले तेव्हाच ते बँकेत पदाधिकारी असतील, हे स्पष्ट झाले होते. इकडे डॉ. सुजय यांनी मात्र तिरपी चाल खेळली. उतावळेपणामुळे नेहमीच हिरमोड झाल्याचा धडा त्यामागे होता. अत्यंत सयंमाने परिस्थिती हातळत सामोरे जायचे व टॉपर व्हायचे हा त्यामागील उद्देश.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पदाची गरीमा राखताना सन्मानाला धक्का लागणार याचीही काळजी विखे कुटुंबाने घेतल्याचे दिसले. सभापती शिंदे हे बिनविरोधाच्या बैठकीला उपस्थित होते. इतकेच काय तर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतरही नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्याचा मानही सभापती शिंदे यांनाच दिला गेला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पडद्यामागचे डावपेच यशस्वी झाल्यानेच डॉ. सुजय यांच्यावर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली गेली. आता ती लिलया पार करण्याची किमया डॉ. सुजय करतील, यात शंका नाही (सध्याचा अंगी संयमी बाणा पाहता).
आशिया खंडातील पहिल्या प्रवरा सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. सुजय यांनी सांभाळलेली असल्याने त्यांच्यासाठी सहकार नवा नव्हता, पण जिल्ह्यातील मातब्बरांशी जुळवून घेताना त्यांना मोठी कसरत करावी लागली. राजकीय स्पर्धकांना एकाच माळेत गुंफणे सोपे नव्हते, पण ती गुंफण डॉक्टरांनी सहजपणे विणली. कसरतीच्या या परीक्षेत डॉ. सुजय नुसतेच उत्तीर्ण झाले नाही तर टॉपरही आले.
थोरात, कोल्हे गटाची विखेंना साथ
अहमदनगर जिल्हा बँकेची १९५८ मध्ये स्थापन झाली. जिल्हा बँकेच्या इतिहासात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी १९६८ ते १९७३ या कालावधीत अध्यक्ष होेते. त्यावेळी विखे-थोरात गट बँकेच्या राजकारणात एकत्र दिसला होता. त्यामुळेच पद्मश्री विखे अध्यक्ष तर सहकारमहर्षि भाऊसाहेब थोरात उपाध्यक्ष झाले होते. डी. के. भगत आणि एस. बी. सोले पाटील यांचीही उपाध्यक्ष म्हणून पद्मश्री विखेंना साथ लाभली.
पद्मभूषण विखेंना अध्यक्ष पदापासून दूर ठेवलं..!
अनेक दशके बँकेचे राजकारण करताना दिवंगत पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी बँकेचे अध्यक्ष पद भूषवले. मात्र, दिवंगत पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांना जिल्हा बँक अध्यक्ष पदाने अनेकदा हुलकावणी दिली. ते राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होते. त्यामुळे जिल्हा बँकेत त्यांचा अपेक्षित रस नव्हता. शिवाय, जिल्ह्यातील स्थानिक संस्थांवर वर्चस्व ठेवण्यासाठी विरोधकांनी अनेकदा एकत्र येत विखे गटाची कोंडी केल्याचा इतिहास आहे.
पद्मश्रींनंतर ३२ वर्षांने राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष!
पद्मश्री विठ्ठलराव विखे यांच्यानंतर तब्बल ३२ वर्षांनी, २००५ मध्ये विखे घराण्याला पुन्हा बँकेच्या नेतृत्वाची संधी मिळाली. पद्मश्रींचे नातू राधाकृष्ण बाळासाहेब विखे पाटील हे २००५ ते २००७ अध्यक्ष झाले. या काळात त्यांनी बँकेचा कारभार यशस्वीरित्या सांभाळला. त्यांना उपाध्यक्ष म्हणून सीताराम गायकर,बापूसाहेब देशमुख, बिपीनराव कोल्हे आदींनी साथ दिल्याचे दिसले. त्यावेळी उपाध्यक्षांचा कार्यकाल हा आठ ते दहा महिन्यांचा असत.
सीएमच्या गुडबुकमध्ये...
मुख्यमंत्री ठरवतील तो अध्यक्ष, उपाध्यक्ष हे डॉ. सुजय विखे पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका राहिली. या भूमिकेशी सुसंगतीनेच डॉ. सुजय यांचे नाव अध्यक्ष पदासाठी तर बाळासाहेब थोरातांचे जावई रणजितसिंह देशमुख यांचे नाव उपाध्यक्ष पदासाठी येताच सर्वंच संचालकांनी सहमती दर्शवत पाठिंबा दिला. म्हणजेच डॉ. सुजय हे बँकेच्या निवडणुकीत टॉपर तर आलेच पण त्यांची नोंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही गुडबुकमध्येही झाली, असे म्हटल्यास अतिशोक्ती ठरू नये.
भाजपाला ताकद!
जिल्हा बँक ही भाजपाच्या ताब्यात आल्याने आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कार्यकत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. अभ्यासू व तरुण डॉ. सुजय विखे पाटलांच्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत महिला बचत गटाचे संघटन असेल किंवा शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांच्या माध्यमातून भाजपाची ताकद वाढणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.