

सोनई: सोनईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शुक्रवारी भरदिवसा चाकूने सपासप वार करत टेम्पो चालकाची हत्या करण्यात आली. हत्येनंतर आरोपी मोटारसायकलने शनिशिंगणापूरच्या दिशेने पसार झाले. रावसाहेब मच्छिंद्र पंडित (वय ३७, रा. रा.धनगरगल्ली,नेवासा) असे हत्या झालेल्या चालकाचे नाव आहे. पोलिस पसार मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.
मालवाहतूक टेम्पो चालवून रावसाहेब पंडित कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. शिंगणापूर रस्त्यावरील डॉ.आंबेडकर चौकात त्यांनी टेम्पो पार्क केला. बारा वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकू केला. चाकूचे वार छाती, पोट व पायावर झाल्याने ते खाली कोसळले.
प्रत्यक्षदर्शीनी आरडओरड केल्याने मारेकरी मोटारसायकलवरून शिंगणापूरच्या दिशेने पसार झाले. दरम्यान रावसाहेब पंडित यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तपासणीपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
भरदिवसा चौकात झालेल्या हत्येने सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे मानले जाते. मृत रावसाहेब यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, चुलते, पुतणे, चुलत भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक धीरज राजगुरू, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे घटनास्थळी पोहचले.
सीसीटीव्हीची तपासणी
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत मारेकऱ्यांचा माग शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आसपासच्या व्यावसायिकांकडेही चौकशी केली जात आहे. हत्या नेमके कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मारेकरी अटकेनंतरच हत्येचे नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.