

बोधेगाव: साखर उद्योगाचे चाक फिरवणाऱ्या ऊसतोडणी कामगारांचे स्थलांतर पुन्हा सुरू झाले आहे. राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होत असून, लाखो मजूर पुन्हा एकदा उसाच्या फडावर जाण्याच्या तयारीत आहेत. दिवाळीचा उत्सव संपताच त्यांच्या जगण्यात पुन्हा स्थलांतर, कष्ट आणि असुरक्षिततेचा हंगाम सुरू होतो. (Latest Ahilyanagar News)
राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांचे बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ पार पडले आहेत. कारखाने गाळपासाठी सज्ज आहेत, परंतु या उद्योगाचे खरे बळ असलेला ऊसतोडणी मजूर वर्ग आजही उपेक्षित आहे. मजुरांशिवाय कारखान्यांची चाके फिरू शकत नाहीत. हे वास्तव वर्षानुवर्षे कायम असतानाही त्यांच्या मूलभूत सुविधांकडे कोणी पाहत नाही.
हंगाम सुरू होण्यापूर्वीच कारखान्यांनी ऊसतोडणी टोळ्यांना मोठ्या रकमांची आगाऊ पेमेंट्स देत त्यांना बांधून ठेवण्याची स्पर्धा सुरू आहे. एका बैलगाडी सेंटरला 1 ते 1.5 लाख, बैल टायर गाडीला 2 लाखांपर्यंत, तर ट्रॅक्टर टोळीला तब्बल 5 ते 7 लाख रुपये आगाऊ पेमेंट दिले जात आहेत. जुलैपासून सुरू झालेली ही प्रक्रिया आता चरमसीमेवर पोहोचली आहे.
दसरा-दिवाळी सण कुटुंबात साजरे करून हे मजूर घरदार, शेती आणि कुटुंब मागे सोडून उसाच्या फडावर उतरतात. सहा महिन्यांच्या उदरनिर्वाहाची चिंता, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि वृद्ध पालकांची काळजी यांसोबत त्यांचे स्थलांतर सुरू होते. ऊन, वारा, थंडी या सगळ्याशी झुंज देत ते दिवस-रात्र श्रम करतात; पण त्यांच्या कष्टाचे मोल कुणीच देत नाही.
कारखाना सुरू होण्याअगोदर ऊसतोडणीची मजुरी हातात येत नसल्याने गावाकडून जातानाच धान्य, जीवनावश्यक वस्तू घेऊन ही कुटुंब निघाली आहेत. दरवर्षी या हंगामाच्या निमित्ताने स्थानिक बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होते, परंतु या व्यवहारांच्या मध्यभागी असलेला मजूर वर्ग मात्र कायम गरिबीच्या कचाट्यातच आहे. त्याच्या घामावरच साखर गोड होते, पण त्यांच्या जीवनात गोडवा अजूनही दिसत नाही.
तोडणी कामगार आजही असुरक्षितच!
राज्यातील साखर उद्योग अब्जावधी रुपयांची उलाढाल करतो, पण त्याच उद्योगाचा पाया असलेला ऊसतोडणी मजूर वर्ग आजही विमारहित, निवाऱ्याविना आणि असुरक्षित आहे. शासनाच्या योजना कागदावर आणि कारखानदारांच्या आश्वासनात अडकून पडल्या आहेत.
बाजारपेठा पडणार ओस!
तालुक्यात उद्योगधंदे, शेतीपासूनचे शाश्वत उत्पन्न नसल्याने रोजंदारी व पोटाची खळगी भरण्यासाठी गावा-गावातून सध्या साखर कारखान्यावर ऊसतोडणी मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. यंदा 1 नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांची धुराडी पेटणार आहेत. त्यामुळे ऊस तोडणीसाठी ट्रॅक्टर ट्रॉल्या भरून सहकुटुंब ऊसतोडणीसाठी कामगार रवाना होत असल्याने तालुक्यातील अनेक गावे, बाजारपेठा ओस पडणार आहेत.