

श्रीरामपूर: महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा योग्य सन्मान न राखला गेल्यास, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या जातील, असा इशारा माजी आमदार लहू कानडे यांनी दिला. दरम्यान, श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आहे. यामुळे नगराध्यक्षपदाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाचं मिळणार आहे, असा ‘शब्द’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे, असे स्पष्ट करीत ते म्हणाले की, आगामी नगरपालिका, पचायंत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्यास, विकास कामांसाठी भरघोस निधी मिळेल. (Latest Ahilyanagar News)
शहरातील यशोधन कार्यालयात दिवाळी फराळ कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माजी आमदार कानडे बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्षा, श्रीसाई संस्थानच्या माजी विश्वस्थ अनुराधा आदिक म्हणाल्या की, माजी आमदार लहु कानडे आयोजित कार्यक्रमासाठी पक्ष नजरेसमोर ठेवून कोणीही येत नाही. सर्व जाती- धर्माचे लोक येतात. त्यांचे काम लोकप्रिय आहे, असे सांगत त्यांनी अंकुश कानडे, अशोक (नाना) कानडे व अधिकारी संग्राम कानडे यांच्या कार्याबद्दल समाधानाचे बोल ऐकविले.
यावेळी सोनल मुथ्था, रुबिना पठाण, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अरुण पाटील नाईक, संजय छल्लारे, राजेश अलघ, रविंद्र गुलाटी, सचिन जगताप, अशोक कानडे, अंकुश कानडे, कैलास बोर्डे, राजेंद्र कोकणे, मुक्तार शहा, राजेंद्र पानसरे, अशोक भोसले, दीपक कदम, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी आमदार लहु कानडे म्हणाले की, श्रीरामपूरच्या विकासात अडथळा आणण्याचे प्रकार जनतेला दिसत आहेत. 2019 ते 2024 या कालावधीत आम्ही 1300 कोटी रुपयांचा विक्रमी निधी या मतदारसंघात आणला. निधी विकास कामांसाठी वापरला. 220 केव्हीए, बसस्थानक सशोभीकरण व रस्त्यांची कामे मंजूर करून आणली.
आज त्याच कामांची उद्घाटने नव्या लोकप्रतिनिधीकडून केली जात आहेत. नव्याने कुठलेच काम मंजूर करण्यात आले नाही. आपलं नेतृत्व रुजू द्यायचेचं नाही, असा अनेकांचा हेतू होता, परंतू येत्या काळात मी श्रीरामपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी पूर्ण वेळ उपलब्ध असणार आहे, असा ठाम विश्वास माजी आमदार लहु कानडे यांनी व्यक्त केला. दरम्यान, यावेळी विधानसभा निवडणूक काळात आपल्याशी काँग्रेस पक्ष व नेते मंडळींनी कशा प्रकारे दगाफटका दिला, याचे विवेचन त्यांनी केले.
कामे मी मंजूर करून आणली.. उद्घाटनाचा ‘त्यांचा’ धडाका!
श्रीरामपूर तालुक्यातील जनतेने मला नाकारलं. नुतन लोकप्रतिनिधीला जनतेने निवडून दिले, परंतू त्यांनी वर्षभराच्या कार्यकाळात कुठलंच नवे विकास काम मंजूर करून आणले नाही. माझ्या कार्यकाळात मी मंजूर करून आणलेल्या विकास कामांचीच उद्घाटने करण्याचाच धडाका त्यांनी सुरू ठेवला आहे, अशी टीका करीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार लहू कानडे यांनी नामोल्लेख न करता आमदार हेमंत ओगले यांच्यावर निशाना साधला.