

संगमनेर: ऐन दिवाळी सणासुदीच्या काळात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला प्राणघातक हत्यारासह जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश आले. गुरुवारी (दि.23) मध्यरात्री याप्रकरणी चौघा सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले असून, एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. (Latest Ahilyanagar News)
दरोडा टाकून मोठी लूट करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. पोलिसांच्या कारवाईत निखील विजय वाल्हेकर (वय 24, रा. वेल्हाळे) अनिकेत गजानन मंडलिक (वय 23, रा. माळीवाडा) मोहन विजय खरात (वय 19, रा. घुलेवाडी) व आदित्य संजय शिंदे (वय 19, रा. अकोले नाका) अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहे. साई शरद सुर्यवंशी (रा. अकोले नाका) हा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
गुरुवारी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब सातपुते, पोलिस कॉन्स्टेबल रामकिसन मुकरे, विजय खुळे, विजय आगलावे, सागर नागरे, आत्माराम पवार, हरिश्चंद्र बांडे व संदीप सिताराम कोंदे यांचे पथक शहरालगतच्या घुलेवाडी शिवारातील हरीबाबा मंदिर परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना संशयास्पदरित्या काही तरुण फिरताना आढळून आले.
पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्याने चौघांना पकडण्यात यश आले. तर एक जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, हे टोळके आसपासच्या परिसरात दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून दरोडा घालण्यासाठी लागणारे प्राणघातक हत्यारे व इतर साहित्य जप्त केले आहे. यात रेडमी कंपनीचे तीन मोबाईल, मोटार सायकल, ज्युपीटर स्कुटी, एअर पिस्टल, दोन लोखंडी कोयता, एक हातोडा, कटावणी, पहार, गज, मिरचीची भुकटी या आदीचा समावेश आहे.
पकडलेले दरोडेखोर सराईत गुन्हेगार
निखिल विजय वाल्हेकर याच्यावर सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे, अनिकेत गजानन मंडलिक याच्यावर दहा गंभीर स्वरूपाचे तर फरार असलेल्या साई शरद सूर्यवंशी याच्यावर नऊ गंभीर स्वरूपाचे गुन्हे संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दाखल आहे. कॉन्स्टेबल विजय खुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पकडलेल्या चौघा व फरार झालेल्या एका आरोपीविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक इमरान खान पुढील तपास करत आहेत. पकडलेल्या चार आरोपींना संगमनेर न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.27 ऑक्टोबर) पोलिस कोठडी सुनावली आहे.