

नगर: सोनई परिसरात गावठी पिस्तुल विक्री करणाऱ्या एलसीबीच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने साथीदारांसह मध्यप्रदेशातून पाच गावठी पिस्तूल व १५ जिवंत काडतूस विक्रीसाठी आणले होते. ते आपआपसात वाटून घेतल्याची धक्कादायक माहिती सांगितली. याप्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन गावठी पिस्तूल व जिवंत कारतुसासह २ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज रामदास कोठवळ (वय २२, रा. नवनाथनगर, सोनई, ता. नेवासा), राजेंद्र सुधाकर जगताप (वय ३०, रा. करजगाव, ता. नेवासा) यांना अटक करण्यात आली. तर, विलास आयनर (रा. अमळनेर, ता. नेवासा), कैलास बबन आयनर (रा. अमळनेर, ता. नेवासा), हरिहर उर्फ बंटी औटी (रा. वाटापूर, ता. नेवासा) असे फरार आरोपीचे नावे आहेत.
पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. २८ सप्टेंबर रोजी पथक सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, पंकज कोठवळ नावाचा तरुण मध्य प्रदेशातून आणलेला गावठी कट्टा विक्री करण्यासाठी खेडले ते सोनई जाणाऱ्या रस्त्यावरील नवनाथनगर परिसरात थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने खेडले ते सोनई रस्त्यावर सापळा लावला.
पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या पंकज कोठवळ याला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ५० हजारांचा गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूस, वीस हजारांचा मोबाईल, दुचाकी असा २ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्याचा साथीदार राजेंद्र जगताप याला करजगाव येथून ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींनी मध्यप्रदेशातून पाच पिस्तूल व १५ जिवंत काडतूस विक्रीसाठी आणले होते. पोलिस पसार आरोपींचा शोध घेत आहेत. सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुले विक्रीसाठी आणली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.