

श्रीरामपूर: शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे जनता हवालदिल झाली असतांना नळाला पर्याय म्हणून कुपनलिका घेण्यासाठी अनेक लोक सरसावल्याने याचा गैरफायदा कुपनलिका खोदणाऱ्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. दुप्पट, तिप्पट दराने कुपनलिका खुदाई केली जात आहे. मर्यादित संख्येत मशीन असल्याने जादा पैसे देऊनही नंबर लागले आहेत.
५० रुपये फुटाचे दर असणाऱ्या कुपनलिका खोदाईचे दर आता ८० ते शंभर रुपये फुट झाले आहे. तरी देखील नंबर लागत नसल्याने नागरिकही जादा रक्कम देऊन बोअरवेल खोदून घेत आहेत. शहराच्या अनेक भागात नागरी वसाहतींमध्ये सामूहिक कुपनलिका घेण्याकडे कल दिसून येत आहे. कॉलनी, अपार्टमेंटमध्ये आठ ते दहा लोक मिळून एक बोअरवेल घेत आहेत. पाईपलाईनने त्याचे पाणी सर्व घरांमध्ये फिरविले जात आहे.
शहरातील पाणीटंचाईवर नागरिकांनी नगरपालिकेवर अवलंबून न राहता स्वतःच उपाययोजना चालू केल्या आहेत. फातिमा कॉलनी परिसरात मागील आठवड्यात १४ लोकांनी मिळून एक बोअरवेल घेतला होता. त्याला भरपूर पाणी लागले. त्यानंतर त्याच भागात काल सहा लोकांनी मिळून दुसरा बोअरवेल घेतला. त्याला देखील चांगले पाणी लागले. त्यामुळे लोकांच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. शहराच्या इतर भागात देखील खाजगी बोअरवेल कनेक्शन घेण्यासाठी नागरिक सरसावले आहेत. परंतु मशिनी मर्यादित असल्याने नंबर लागत नाही. दोन-दोन, तीन-तीन दिवस वाट पाहावी लागत असल्याचे दिसून येत आहे.
संख्या वाढल्यास आटण्याची शक्यता
दरम्यान, पाणीटंचाईवर उपाय म्हणून बोअरवेल खोदाई केली जात असली तरी कुपनलिकांची संख्या वाढल्यास अनेक बोअरवेल आटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एका भागामध्ये ठराविक मर्यादेतच या बोअरवेल घ्याव्यात जेणे करून इतरांचे पाणी जाणार नाही, अशी चिंता देखील नागरिक व्यक्त करीत आहेत.
शंभर फुटाच्या पुढे पाणी
श्रीरामपूरच्या दोन्ही बाजूला प्रवरा आणि गोदावरी नद्या असल्या तरी श्रीरामपूर उंचवट्यावर असल्याने पाणी पातळी खोलावली आहे. त्यामुळे बोअरवेल घेताना देखील शंभर फुटाच्या पुढेच पाणी लागते. त्यामुळे पाणी टंचाईचा गैरफायदा घेऊन बोअरवेल खोदाईचे दर वाढविल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.