

श्रीरामपूर: तालुक्यातील उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दुधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे याप्रकरणी नानासाहेब गलांडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत योगिता गलांडे-मस्के यांनी सांगितले की, नानासाहेब गलांडे पाटील जमीन नोंद प्रकरणात अखेर सत्य उघड झाले असून 30 जानेवारी 2026 रोजी भूमीलेख उपसंचालक नाशिक यांनी अपीलवरील अंतिम निर्णयानंतर उंदीरगाव येथील गट क्रमांक 79 संदर्भातील वादग्रस्त फेरफार कायदेशीरदृष्ट्या अमान्य ठरवत मूळ नोंदी कायम ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. जमीन नोंद फसवणूक प्रकरणे रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असेही योगिता मस्के यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणात न्यायालयीन घडामोडीही वेगाने पुढे सरकत असून फसवणूक व बनावट कागदपत्रांच्या आरोपांप्रकरणी आरोपी प्रवीणकुमार उत्तमचंद छल्लानी व राजेंद्रकुमार दुधेडिया यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 420, 468, 471 सह 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी जितेंद्र जाधव, न्यायाधीश प्रथम श्रेणी, कोर्ट क्रमांक 1, श्रीरामपूर यांनी 25 फेब्रुवारी 2026 रोजी आदेश दिले आहेत.
आरोपी क्रमांक 3 पंकज सुधाकर फेगडे, उप अधीक्षक, भूमिअभिलेख यांच्याविरुद्धची तक्रार फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 च्या कलम 197 अंतर्गत मंजुरीच्या अभावामुळे नाकारण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस तपासही करण्यात आला असून, जबरदस्तीने नोंद लावून घेतल्याबाबत संबंधित अधिकाऱ्याने कबुली दिल्याची नोंद तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्यामुळे खोटी नोंद व दबावातून करण्यात आलेल्या फेरफार प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. ॲड बापूसाहेब इंगळे, ॲड अरुण लबडे, ॲड. यशवंत उंडे यांनी न्यायालयात बाजू मांडली.