

नगर तालुका : नगर तालुका गेल्या दोन दशकांपासून कांद्याचे पठार म्हणून उदयास आला आहे. तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात लाल, रांगडा, तसेच गावरान कांद्याचे उत्पादन होत असते. विक्रमी उत्पादनामुळे तालुक्याला नव्याने कांद्याचे पठार म्हणून ओळख मिळाली आहे. परंतु कांद्याचे गडगडलेले भाव अन् वातावरणात झालेला बदल, यामुळे तालुक्यातील बळीराजांच्या अडचणीत वाढ झालेली पहावयास मिळते.
तालुक्यातील जेऊरपट्टा हा कांदा उत्पादनासाठी अग्रेसर समजला जातो. ससेवाडी, बहिरवाडी, इमामपूर, जेऊर, डोंगरगण, धनगरवाडी या परिसरातील कांद्याची गुणवत्ता व विक्रमी उत्पादनामुळे या परिसरात राज्य, तसेच परराज्यातील कांद्याचे व्यापारी स्थायिक झाले आहेत. शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक गणित कांदा पिकावरच अवलंबून असते. परंतु चालू वर्षी लाल कांदा, रांगडा कांदा, तसेच गावरान कांदा तिन्ही पिकांनी शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरवले आहे. वाळकी, चास, अकोळनेर घोसपुरी, खडकी, विळद, देहरे, चिचोंडी पाटील, भोरवाडी, पांगरमल, हिंगणगाव या परिसरातील कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते.
लाल कांदा व रांगडा कांदा अतिवृष्टीने वाया गेला, तसेच बाजारात कवडीमोल भावाने विकावा लागला होता. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांशी भागात पाणी उपलब्ध असल्याने गावरान कांद्याची लागवड ही मोठ्या प्रमाणात झाली होती. परंतु गेल्या तीन-चार दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. ढगाळ हवामानामुळे कांदा पीक विविध रोगांच्या विळख्यात सापडले आहे. कांदा पिकावर मावा, तुडतुडे, तपकिरी करपा, डाऊनी यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. महागड्या औषधांची फवारणी तसेच अतिरिक्त खतांचा वापर, यामुळे खर्चात वाढ होणार आहे तर रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बदलत्या वातावरणामुळे अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अवकाळी पाऊस झाल्यास तालुक्यात गहू, मका, तसेच सर्वच पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लसूण पिकालाही विविध रोगांनी ग्रासले आहे.
दोन एकर लाल कांद्याची लागवड करण्यात आली आहे. त्यासाठी एकरी 50 ते 60 हजार रुपये खर्च आला. वातावरणात झालेल्या बदलामुळे कांदा पिकाला विविध रोगांनी ग्रासले आहे. त्यातच योग्य बाजारभावही मिळत नाही. खर्चात वाढ होणार असून उत्पादन मात्र घटणार आहे. उत्पादन खर्चही वसूल होणार नाही. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे.
सुधीर पवार, शेतकरी, जेऊर
उच्च प्रतीचे बुरशीनाशक व कीटकनाशक औषधांची फवारणी करावी. गरजेनुसार पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे. वेळोवेळी कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधांची फवारणी करावी.
सुरेखा घोंडगे, सहायक कृषी अधिकारी