

नेवासा: नेवासा परिसरात सध्या सोयाबीन पिकांची सोंगणी करून मळणी यंत्रामार्फत सोयाबीन तयार करण्याची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, मजुरीच्या दरात वाढ झाल्यामुळे, तसेच सोयाबीन पिकाचे सध्याचे बाजारभावही कमी झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सोयाबीनचे उत्पन्न कमी आणि बाजारभावही तोकडा यामुळे यंदा सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. (Latest Ahilyanagar News)
तालुक्यात चालू वर्षी पावसाने सोयाबीन पिकाची पूर्ण वाताहत झालेली आहे. मोसमी पावसाने सर्वत्र दाणादाण केली आहे. परतीच्या पावसाचाही दणका सोयाबीन पिकाला बसल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतात पावसाच्या पाण्याचे तळे झाल्याने आहे ते सोयाबीन काढणे जिकिरीचे बनले आहे. सोंगणी व काढणीचे काम करणाऱ्यांना भाव आला. शेतात ओलीचे कारण सांगून मजुरांचे दर वाढले आहेत.
यंदा सोयाबीन काढणीचा एकरी दर 5500 ते 6 हजारांपर्यंत गेला आहे. गेल्या वेळी सोयाबीन पीक चांगले आले, तर एकरी सरासरी 13 ते 15 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळत होते. मात्र, यंदा सरासरी उत्पन्न एकरी 6 ते 7 क्विंटल मिळत आहे. मळणी यंत्रचालकांनी गेल्या वर्षीपेक्षा दर वाढविले आहे. मागील वर्षी 250 रुपये पोते होते. एकरी उत्पादन कमी झाल्यामुळे शेतकरी अडचणीत असताना काढणी व सोंगणी दर वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
मळणी यंत्रमालकांनी प्रतिपोत्याला आता 300 रुपये दर केलेला आहे. तरीही त्याची प्रतीक्षा करावी लागते. भाववाढीमुळे शेतकऱ्यांना जवळपास 90 टक्के आर्थिक फटका बसू लागला आहे. सोयाबीन बाजारभाव अवघा 4 हजारांच्या आतच मिळत असल्याने लोकांची उधार उसनवारी कशी द्यावी हा प्रश्न सतावत असल्याने शेतकऱ्यांना चिंतेने ग्रासले आहे. दिवाळीमुळे मातीमोल भावाने सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
तालुक्यात खरिपातील पिकांची वाट लागली आहे. त्यात नुकसानभरपाईने पाठ दाखवली आहे. केवळ पंचनाम्यासाठी धावपळ केल्याचे मध्यंतरी दिसून आले. परंतु भरपाई व विमा रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
खरिपातील पिके पूर्णतः गेली आहे, तसेच मोठ्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांची शाश्वती असल्याने रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यंदा पावसाने चांगलाच कहर केल्याने शेतीमालाला भाव नसल्याने सणासुदीच्या काळात शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.
खरिपामधील कपाशी, सोयाबीन आदी पिकांचे महसूल विभागाने पंचनामे केले. परंतु मोठ्या प्रमाणात शेतकरी मदतीपासून वंचित आहे. कधी मदत मिळेल हे कोणी सांगू शकत नाही. शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ज्ञानेश्वर दाणे, शेतकरी, नेवासा