

बोधेगाव: शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे सावट पसरले आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, असतानाच आता कपाशी पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत असल्याच्या तक्रारी होत आहेत. (Latest Ahilyanagar News)
अतिवृष्टीमुळे खरीप पिके वाया गेल्यानंतर कपाशी पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे कपाशी उत्पादन अर्ध्यावर आले असून, खर्चही वसूल होण्याची शक्यता नाही. कीटकनाशके फवारूनही रोगावर नियंत्रण न आल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
कवडीमोल भाव; शेतकऱ्यांचा संताप
कापसाच्या बाजारभावाने शेतकऱ्यांचा संयमाचा बांध कोसळला आहे. शासनाचा हमीभाव 8 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल असतानाही शासकीय खरेदी केंद्र सुरू नसल्याने खासगी व्यापारी केवळ पाच ते साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी करत आहेत.
खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. मेहनतीने घेतलेले पीक कवडीमोल भावात विकावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारने तत्काळ सीसीआयमार्फत खरेदी केंद्र सुरू करून हमीभावाने खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
खत, बियाणे, मजुरी आणि सिंचनावरचा वाढलेला खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांचा आर्थिक ताळमेळ पूर्णपणे बिघडला असून, बळिराजा आज दुहेरी संकटात सापडला आहे. आता या संकटातून शेतकऱ्यांना कोण बाहेर काढणार, हाच प्रश्न सतावत आहे. शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागले आहेत.
नुकसानभरपाईचा दिलासा
गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. राज्य सरकारने दिलासा देत नुकसानभरपाईच्या तालुक्यात पहिल्या टप्प्यात 78 हजार 669 शेतकऱ्यांना 107 कोटी 25 लाख रुपये मंजूर केले आहेत. दिवाळीपूर्वी रक्कम खात्यात जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाला दिले होते. मात्र, विभागातील दिरंगाईमुळे प्रक्रिया थोडी विलंबली. सध्या नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागली असून, विविध बँकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी दिसत आहे. शेतकऱ्यांनी ही मदत तुटपुंजी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली असून, पुढील टप्प्यात केंद्र सरकारकडूनही अतिरिक्त मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बळिराजावर दुहेरी संकट
अतिवृष्टी, कीडरोग, कमी भाव आणि विलंबित मदत या सगळ्यांचा एकत्र परिणाम म्हणून शेवगाव तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सरकारने तत्काळ शासकीय खरेदी केंद्र सुरू करून, लाल्या रोगग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.