

श्रीरामपूर: नगरपरिषदेतील उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी आज (सोमवारी) विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात काँग्रेसचे तीन, भाजपचा एक स्वीकृत सदस्य ठरणार आहे. मात्र, उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकाची लॉटरी नेमकी कोणत्या निष्ठावंतांना लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आज सोमवार दि. 12 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून, स्वीकृत सदस्य निश्चित होणार आहे. संबंधित नावे जवळपास अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.
नगरपरिषद निवडणुकीत एकूण 34 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे 20, भाजपचे 10, शिवसेनेचे (शिंदे गट) तीन आणि एक अपक्ष नगरसेवक आहे. काँग्रेसकडून ज्येष्ठ नगरसेवक मुजफ्फर शेख, तर भाजपकडून वैशाली चव्हाण यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. स्वीकृत सदस्य निवडीसाठी आठ नगरसेवकांमागे एक, असा कोटा आहे. काँग्रेसकडे 20 नगरसेवकांसह शिवसेनेच्या (शिंदे गट) दोन नगरसेवकांचा पाठिंबा असून, नगराध्यक्षांना दोन मतांचा अधिकार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून तीन स्वीकृत सदस्य निश्चित मानले जात आहेत. यामध्ये पूर्वाश्रमीचे शिवसैनिक डॉ. दिलीप शिरसाठ, अंजुम शेख, रितेश रोटे आणि गोपाल लिंगायत यांची नावे जवळपास अंतिम असल्याचे समजते.
जैन समाजाला प्रतिनिधित्व देण्याबाबत चर्चा झाली होती; मात्र सखोल विचारानंतर वरील तीन नावांवर एकमत झाल्याची माहिती आहे. भाजपकडे 10 नगरसेवक असून, अपक्ष नगरसेवक अर्जुन दाभाडे यांचा त्यांना पाठिंबा आहे. भाजपकडून स्वीकृत सदस्यपदासाठी श्रीनिवास बिहाणी यांचे नाव आघाडीवर असून, संजय छल्लारे व कैलास दुवैया यांची नावेही चर्चेत आहेत. या निवडीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे. दरम्यान, निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मराठा उमेदवारांना संधी देत यश मिळवलेल्या काँग्रेसकडून सत्तेच्या वाटपातही तोच फॉर्म्युला राबविला जाणार की, सामाजिक समतोल साधणारा अन्य पर्याय स्वीकारला जाणार, याकडे लक्ष लागले आहे. उपनगराध्यक्षपदासाठी दिलीप नागरे, कांचन सानप यांची नावे चर्चेत असून, योगेश जाधव यांचे नावही पुढे आले आहे. यापैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, की ऐनवेळी नवे नाव पुढे येणार? हे आज स्पष्ट होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम
उपनगराध्यक्षपदासाठी आज सकाळी 10 ते 12 या वेळेत नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात येणार आहेत. दुपारी दोन वाजता छाननी, त्यानंतर 15 मिनिटांत माघार प्रक्रिया पूर्ण होणार असून, आवश्यक असल्यास मतदान घेतले जाईल. उपनगराध्यक्ष निवडीनंतर लगेचच स्वीकृत सदस्यांची नावे अधिकृतरीत्या जाहीर केली जाणार आहेत.
एकनिष्ठ चेहऱ्यांना संधी द्यावी: अंभोरे
गेल्या दोन ते तीन वर्षात ज्यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळविली, अशा उमेदवारांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी स्वीकृत नगरसेवक पदाची संधी न देता, अनेक वर्षांपासून श्रीरामपूर भाजपाशी एकनिष्ठ असलेल्या चेहऱ्यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी द्यावी, अशी मागणी श्रीरामपूर शहर भाजपा सरचिटणीस विशाल अंभोरे यांनी केली आहे.