नगर: अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. ऐन थंडीच्या दिवसांत आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापले आहे. शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी जाहीर सभा, प्रचार रॅली आणि उमेदवारांच्या घरोघरी भेटीगाठी घेत प्रचाराचा धुरळा उडाला आहे. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगडी, तसेच खासदार असदुद्दीन आवेसी यांनी जाहीर सभा घेत रविवारी प्रचारात रंगत आणली.
दरम्यान, जाहीर प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस उरले असून, आगामी दोन दिवसांत उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या जाहीर सभांच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोपांची राळ उडणार आहे. महापालिकेच्या 63 जागांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. राज्याच्या महायुती सरकारमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन घटक पक्षांची युती झाली असून, तिसरा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र वेगळी चूल मांडत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस युतीला आव्हान दिले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांनी महाविकास आघाडी कायम ठेवत उमेदवार उभे केले आहेत.
गेल्या आठ दिवसांत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सभा, रॅली आणि भेटीगाठी सुरू आहेत. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी प्रचाररॅली काढली. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. आमदार संग्राम जगताप, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शनिवारी केडगाव व इतर ठिकाणी प्रचाररॅली काढली. काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार, आमदारांनी सभा घेत निश्चयनामा जाहीर केला आहे.
रविवारी (दि.11) सुटीच्या दिवशी जाहीर सभा, प्रचार रॅली काढून विविध राजकीय पक्षांनी राजकीय वातावरण निर्माण केले आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगडी यांनी मुकुंदनगरात जाहीर सभा घेतली. याच मुकुंदनगरात रात्री एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर सभा घेतली. श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी देखील रविवारी कोठी येथे सभा घेत रॅली काढली. मंगळवारी (दि.13) सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर प्रचार थांबणार आहे. त्यामुळे जाहीर प्रचारांसाठी राजकीय पक्षांचे स्टार प्रचार आणि उमेदवारांना प्रचारासाठी अवघे दोनच दिवस उरले आहेत.
प्रचारकांच्या भेटींनीच सरला नगरकरांचा रविवार
सुटीचा दिवसाचा लाभ घेत विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपापल्या वार्डातील मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. मीच आणि माझा पक्षच कसा शहराचा कायापालट करणार याची भविष्यवाणी सांगितली. सकाळी एका पक्षाचा दुपारी दुसऱ्याच तर सायंकाळी आणखी एका पक्षाच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीतच मतदारांचा सुटीचा दिवस गेला.