

शिर्डी: गॅस टंचाईची शक्यता लक्षात घेता बचतीच्या दृष्टीने शिर्डी संस्थानने प्रसादलयातील भोजन मेन्यूतून दाळ-भात बंद करत त्याऐवजी पुलाव आणि एकच भाजी देण्याचा निर्णय घेतला आहे. समाधी मंदिरातील दर्शनानंतर दिला जाणार लाडू प्रसादात कपात करत एकाला एकच पॅकेट लाडू देण्याचा निर्णय घेण्यात आला. पंधरा दिवस पुरेल इतका गॅस साठा संस्थानकडे असल्याची माहिती संस्थान प्रशासनाकडून देण्यात आली.
देशभरात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. व्यावसायिक सिलिंडर बंद केले आहेत. या पार्श्वभूमीवर बचतीचा उपाय म्हणून शिर्डी संस्थानने प्रसादलयातील भोजनाच्या मेन्यूत तात्पुरता बदल केला आहे. गॅस आणि इंधनाची बचतीसाठी प्रसादालयात दाळ-भाताऐवजी खिचडी किंवा पुलाव दिला जाणार असून, भोजनात मिळणाऱ्या दोन भाज्यांऐवजी आता केवळ एकच भाजी दिली जाणार आहे.
संस्थानच्या प्रसादालयात दररोज सुमारे 50 हजार भाविकांसाठी भोजन तयार केले जाते. त्यासाठी दररोज सुमारे दोन टन एलपीजी गॅसचा वापर होतो. याशिवाय साईभक्तांसाठी नाश्ता पाकिट दिले जाते. संस्थानकडे गॅस साठवणुकीसाठी 10 टन क्षमतेचे 2 स्टोअरेज टँक आहेत. त्यात 20 हजार किलो गॅस साठवता येतो. हा साठा साधारणत: 15 दिवस पुरतो. युध्द सुरू झाल्याच्या काळात संस्थानने 15 टन क्षमतेचे गॅस टँकर मागविला. तो साधारणत: 15 दिवस पुरेल.
ही पार्श्वभूमी पाहता उपलब्ध गॅसचा काटकसरीने आणि योग्य वापर व्हावा, यासाठी संस्थान प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. त्याच उद्देशाने प्रसादालयातील भोजनातील महत्त्वपूर्ण बदल शनिवारपासून (दि.14) करण्यात आला आहे. संस्थानकडे स्वत:चा सोलर प्लांट आहे. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर तो मोठा आधार ठरत आहे. या सोलर प्लांटच्या माध्यमातून भात आणि डाळ शिजवला जात आहे. गॅसचा वापर कमी करण्यासाठी या अपारंपरिक ऊर्जेचा वापर केला जात आहे. सोलरच्या माध्यमातून दररोज सुमारे दोनशे किलो एलपीजी गॅस बचत होत आहे.
शनिवारपासूनच अमंलबजावणी
यापूर्वी संस्थानाकडून भक्तांच्या मागणीनुसार हवे तितके लाडू पॅकेट दिले जात होते. मात्र, गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून एका भक्ताला केवळ एकच लाडू पॅकेट देण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला.