

बाळासाहेब खेडकर
बोधेगाव: शेवगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यंदा नगराध्यक्षपदासाठी तब्बल सहा महिला उमेदवार रिंगणात उतरल्या. परंतु प्रत्यक्षात अटीतटीची खरी लढत चार प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये रंगल्याचे चित्र मतदानादरम्यान स्पष्ट दिसले.
परवीन एजाज काझी (राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार गट), रत्नमाला फलके (भाजप), विद्या अरुण लांडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), माया अरुण मुंडे (शिवसेना शिंदे गट) या चौघींमधील अटीतटीचा सामना पाहता, शेवगावची पहिली महिला नगराध्यक्षा कोण? याकडे आता शहराचे डोळे लागले आहेत. माया मुंडेंच्या अचानक उमेदवारीने बदलले राजकीय समीकरण निवडणुकीतील सर्वांत मोठा राजकीय ट्विस्ट म्हणजे अरुण मुंडे यांच्या पत्नी माया मुंडे यांची शिवसेना (शिंदे गट) कडून झालेली अनपेक्षित उमेदवारी.
अरुण मुंडे यांनी पत्नीला भाजपकडून उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा असूनही त्यांना पक्षाने डावलले. परिणामी त्यांनी शेवटच्या क्षणी माया मुंडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देत संपूर्ण समीकरणे पालटून टाकली. या उमेदवारीला जोरदार पाठबळ देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवगावात जाहीर सभा घेतली. यामुळे निवडणुकीला प्रचंड चुरस आली. यातच जनशक्तीचे ॲड. शिवाजीराव काकडे व हर्षदा काकडे यांच्या शिवसेनेतील अचानक प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढली आणि निवडणुकीत नवीनच उत्साह संचारला.
भाजपचा विकासाच्या मुद्द्यावर भर
भाजपच्या आ. मोनिका राजळे यांनी स्वतः मैदानात उतरून शहरात मोठ्या प्रचार मोहिमा राबवल्या. मी स्वतः उभी आहे; विकास हा माझा मुख्य मुद्दा असे सांगून त्यांनी मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला.
प्रतापराव ढाकणे यांनी चौकसभांमधून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. शहर विकास जाणूनबुजून थांबवण्यात आल्याचा आरोप करत, शहराला विकासापासून दूर ठेवणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवा असे आवाहन त्यांनी केले. माजी आ. चंद्रशेखर घुले व माजी सभापती डॉ. क्षितिज घुले यांनीही विविध प्रभागांमध्ये प्रचारसभांची मालिका घेत विकासाचे आश्वासन दिले.
मतदानाचा आढावा - 24,443 मतदारांनी केला सहभाग
शेवगाव नगरपरिषदेच्या एकूण 22 जागांसाठी (नगराध्यक्ष 1 व नगरसेवक 21) झालेल्या मतदानात एकूण 97 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.
एकूण 35 हजार 479 मतदारांपैकी 24 हजार 443 मतदानाचा हक्क बजावला. राजकीय तापलेल्या वातावरणाच्या तुलनेत मतदानाचा टक्का अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने फायदा कोणाला? तोटा कोणाला? यावर शहरभर चर्चा रंगली आहे.
केवळ 21 नगरसेवकांसाठी झाले मतदान
शेवगाव शहरातील 12 प्रभागांमधून एकूण 24 नगरसेवक जागांची निवडणूक घोषित करण्यात आली होती. परंतु प्रभाग 1-ब, प्रभाग 5-अ, प्रभाग 12-अ या तीन जागांवर न्यायालयीन कारणांमुळे मतदान रद्द करण्यात आले. त्यामुळे प्रत्यक्षात 21 नगरसेवक जागांसाठी 91 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.
क्रॉसव्होटिंग आणि ‘लक्ष्मी दर्शन’ची चर्चा
निवडणुकीत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्रॉसव्होटिंग झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. तसेच अनेक प्रभागांमध्ये लक्ष्मी दर्शनाची जोरदार वर्दळ झाल्याच्या चर्चेमुळे मतदारांमध्ये नाराजीही व्यक्त होत आहे. नागरिकांपैकी अनेकांनी विकासाऐवजी पैशाच्या देवाणघेवाणीला प्राधान्य मिळाल्याने शहराच्या विकासाचे वाटोळे झाले अशी प्रतिक्रिया दिली.