

राहुरी: नगर-मनमाड राज्य महामार्गाच्या दुरवस्थेचा मुद्दा जरी सर्व स्तरांतून मांडला जात असला, आंदोलने झाली असली, आश्वासने मिळाली असली, तरीही हा मार्ग अजुनही मृत्यूचा सापळाच आहे.
काल (दि. 5 डिसेंबर) सकाळी 11 वाजेच्या सुमारास राहुरी कॉलेजसमोरील हॉटेल साईदर्शनजवळ झालेल्या भीषण अपघातात एका 47 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर चारजण जखमी झाले. अहिल्यानगर न्यायालयात कार्यरत असणारे बाळासाहेब सोन्याबापू साळवे (रा. नवीन गावठाण बारागाव नांदुर, ता. राहुरी) हे त्यांच्या पत्नी व तीन बहिणींसह संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथे भाच्याच्या लग्नासाठी जात होते. त्यावेळी भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या चारचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
या अपघातात लक्ष्मीबाई बाळासाहेब साळवे (वय 47) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. इतर जखमींना तात्काळ राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश मिसाळ यांनी लक्ष्मीबाई साळवे उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. तर घटनेत बाळासाहेब साळवे व त्यांच्या भगिनी जखमी झालेल्या आहेत.
किती बळी घेणार; नातेवाईकांचा आक्रोश
अपघातानंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. मृतदेह पाहून आक्रोश उसळला. नगर-मनमाड महामार्ग आणखी किती जीव घेणार? सरकारी यंत्रणेची झोप कधी मोडणार, असा संतप्त प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला.
महामार्ग दुरुस्तीचा मुद्दा पेटणार?
या अपघातामुळे महामार्गाच्या दुरुस्तीबाबत पुन्हा असंतोष निर्माण होत असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. काम सुरू करून अर्धवट सोडले, त्यामुळे ही जबाबदारी कोणाची?
ठेकेदार गायब; काम अर्धवट
नगर-मनमाड महामार्गाची दुरवस्था गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. मार्गावर मोठे खड्डे, वाहतुकीचा ताण, पॅचवर्कची बकाल स्थिती, यामुळे हा महामार्ग दुर्दैवी मृत्यूचा सापळा बनला आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाल्यानंतरच ठेकेदार हलला आणि राहुरी फॅक्टरीपर्यंत काही अंतर दुरुस्त करण्यात आले. परंतु त्यानंतर ठेकेदाराचे मशिनरी, कर्मचारी किंवा साहित्य रस्त्याच्या हद्दीत दिसतच नाही.त्यामुळे शासन व प्रशासनाची बेपर्वा भूमिका पुन्हा अधोरेखित होत आहे.