

नगर तालुका: अरणगाव-वाळुंज बायपास रस्त्यावर बाबुर्डी घुमट (ता. नगर) शिवारात शुक्रवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास भरधाव चाललेल्या एका टॅव्हल्स बसने अचानक पेट घेतला. या घटनेत सुदैवाने सर्वच प्रवासी सुरक्षित राहिले आहेत. परंतु बस पूर्णपणे जळून खाक झाली.
पुणे-बीड (एमएच 09 सीव्ही 6309) ही ट्रॅव्हल्स पुण्याहून बीडच्या दिशेने चालली होती. या बसमध्ये 27 प्रवासी होते. अरणगाव-वाळुंज बायपास रस्त्यावरून बाबुर्डी घुमट शिवारात पहाटे पावणेचारच्या दरम्यान बस भरधाव चालली असताना बसने अचानक पेट घेतला.
बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालक आणि बसमधील प्रवासी पटकन बसमधून उतरले. प्रवासी बसमधून उतरताच आगीने भडका घेतला. त्यात बस पूर्णपणे जळून खाक झाली.
घटनेची माहिती नगर तालुका पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले. अग्निशामक दलालाही पाचरण करण्यात आले. पोलिस आणि अग्निशमन दलाने आग अटोक्यात आणली.
मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. आगीची कशामुळे लागली, हे स्पष्ट झाले नसून बस कोणत्या ट्रॅव्हल्स कंपनीची आहे, याचा शोध नगर तालुका पोलिसांकडून घेतला जात आहे.