

राहुरी: शहरात वीजचोरीचा मोठा आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. कॉलेज रोड परिसरातील पारस डेअरी येथे वीज मीटरमध्ये जाणीवपूर्वक छेडछाड करून तब्बल 21 महिन्यांत 1 लाख 1 हजार 102 युनिटची वीजचोरी केल्याचा गंभीर प्रकार महावितरणच्या भरारी पथकाच्या तपासणीत स्पष्ट झाला आहे. या प्रकरणी 25 लाख 9 हजार 300 रुपयांचे देयक ठोठावले असून, रक्कम न भरल्याने अखेर डेअरी चालकाविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणच्या भरारी पथकातील सहाय्यक अभियंता धनंजय त्रिंबक एकबोटे (वय 34) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 28 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता पारस डेअरी, कॉलेज रोड, राहुरी येथील औद्योगिक वीज कनेक्शनची तपासणी करण्यात आली. या तपासणीत कनिष्ठ अभियंता राजेश रणधीर व वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल गारुडकर उपस्थित होते.
तपासणीदरम्यान डेअरीचे वीज मीटर शेडच्या उंच व दुर्गम ठिकाणी बसवलेले असल्याचे आढळून आले, जे सहज तपासता येणार नाही, अशी रचना मुद्दाम करण्यात आल्याचा संशय बळावला. मीटरच्या सील व बाह्य स्थिती संशयास्पद वाटल्याने अचूकता तपासली असता, संबंधित 3 फेज मीटर तब्बल 53.94 टक्के मंद गतीने वीज नोंदवत असल्याचे स्पष्ट झाले. संशय अधिक गडद झाल्याने मीटर सील करून श्रीरामपूर येथील चाचणी कक्षात पाठविण्यात आला.
चाचणी कक्षात ग्राहक व पंचांच्या उपस्थितीत तपासणी केली असता, मीटर 66.12 टक्के मंद गतीने कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले. मीटर उघडून पाहिल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले. आर फेज सिटीची काळी वायर व बी फेज सिटीची लाल वायर कापून मीटरमध्ये थेट छेडछाड करण्यात आल्याचे उघड झाले. या संपूर्ण प्रकाराचे छायाचित्रे, व्हिडिओ पुरावे व सविस्तर अहवाल महावितरणकडे उपलब्ध आहेत.
या प्रकरणात ग्राहक राजेंद्र भीमराज रोकडे यांनी डेअरीतील विद्युत उपकरणे चालविण्यासाठी जाणीवपूर्वक मीटरमध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणावर वीजचोरी केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यानुसार राहुरी उपविभागाकडून दि. 10 डिसेंबर 2025 रोजी वीजचोरीचे देयक बजावण्यात आले होते. मात्र वारंवार सूचना देऊनही देयक किंवा तडजोडीची रक्कम न भरल्याने अखेर महावितरणने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. आरोपीविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम (सुधारणा) 2003 चे कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.