

शिवाजी क्षीरसागर
संगमनेर: उन्हाची तीव्रता वाढताच तालुक्यात पाणी टंचाई जाणू लागली असून पंचायत समितीकडे पाच ग्रामपंचायतीने टँकर मागणीचे प्रस्ताव दाखल केले आहे. हे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले असून मंजुरी मिळताच संगमनेर तालुक्यात या वर्षीचा पहिला टँकर सुरू केला जाणार आहे.
यंदा तालुक्यातील काही गावात पाण्याची स्थिती समाधानकारक असल्याने टँकर मागणी उशिरा होत आहे. ज्या ग्रामपंचायत हद्दीत पिण्याचे पाण्याची समस्या जाणवते, त्या पंचायत समितीकडे टँकरची मागणी करतात. तो जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजूरीसाठी पाठवला जातो. मंजुरी येतात टँकर सुरू केले जातात. सध्या पाच गावांना पाण्याची समस्या जाणवत असून, एप्रिल व मे महिन्यात या टँकरची मागणी वाढणार आहे.
‘या’ पाच गावांचा घसा कोरडा
दरवर्षी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता पंचायत समितीकडे ग्रामपंचायती टँकर मागणीचे अहवाल सादर करत असतात. त्या अहवालातील आधारावरच टंचाई आराखडा तयार केला जातो. यंदा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाणीटंचाई जाणवू लागल्याने पाच ग्रामपंचायतीने टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीला सादर केले आहे. यात पिंपळगाव देपा, कर्जुले पठार, गुंजाळवाडी पठार, वरवंडी व खरशिंदे गावच्या दोन वाड्यांचा समावेश आहे.
यंदा टँकरची मागणी उशीराने
पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होतो. 2023 या वर्षी डिसेंबर महीन्यातच एक टँकर सुरू झाला होता. तर फेब्रुवारी 2024 मध्ये दोन टँकर सुरू करण्यात आले. टँकरची मागणी केली जाते. मागिल वर्षी पावसाने उशिरा हजेरी लावल्याने संगमनेर तालुक्यात विहिरींनी तळ गाठला होता. 2024 मध्ये ऑगस्ट अखेर टँकर सुरू होते. तर यंदा 2026 मार्च अखेर टँकरची मागणी होत आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांचा चाराही महत्त्वाचा आहे. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा तालुक्यात अनेक गावात उपलब्ध आहे. उन्हाचा पारा चढताच विहिरी तळ गाठतात. पिण्याच्या पाण्याची समस्या मात्र कायम आहे.
गतवर्षी 61 गावांना टँकरने पाणी पुरवठा
मागिल वर्षी 2025 फेब्रुवारी महिन्यातच टंचाईची चाहूल जाणवू लागली होती. संगमनेरातील 61 गावांना पाण्याची कमतरता लक्षात घेता टंचाई आराखडा सादर केला होता. तीन तीन महीन्यांचे दोन भागात जून अखेर 61 गावे व त्या गावा अंतर्गत येणाऱ्या वाड्यांना 20 टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता. 2024 मध्ये 81.75 मि.मि. पावसाची नोंद झाली होती. यामुळे टंचाई काळात 40 गावे व 131 वाड्यांना 31 टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता. ऑगस्ट अखेर टँकर सुरू होते. या तुलनेत 2025 ला पाणी टंचाई कमी होती. फेब्रुवारी महिन्यात सायखिंडी गावाने टँकरची मागणी केली होती.